मुख्यमंत्र्यांनी सांगितले कोरोनाची लस कधी येणार…नागरिकांनी गाफील राहू नये !
मुंबई (वृत्तसंस्था)। जगभर पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे अक्षरश: सर्वच देश हैराण झाले आहेत. या कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस काढण्यासाठी सर्वच देश प्रयत्न करत असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लस केव्हा येणार? याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणतात की, ‘कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस येण्यास डिसेंबर महिना उजाडणार आहे. त्यामुळे आणखी चार महिने असेच काढावे लागणार आहेत.’
‘आगामी काळात विविध धर्मीय सण असल्याने पुढचा टप्पा महत्त्वाचा आहे. त्यामुळे गर्दी अपरिहार्य असली तरी नागरिकांनी गाफील राहू नये’, अशा सूचनावजा इशारा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. पुण्यातील सीईओपी कोविड १९ रुग्णालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. ‘येत्या डिसेंबरमध्ये लस येईलच पण महाराष्ट्रातील जनता ११ ते १२ कोटींच्या घरात आहे. त्यामुळे ती लस आल्यानंतर त्याची इम्युनिटी किती असणार, कशी मिळणार या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर तूर्त नागरिकांनी मास्क, हात धुणे, एकमेंकापासून अंतर ठेवणं हे नागरिकांनी पाळणे हाच उपाय आहे’, असेही मुख्यमंत्री पुढे म्हणाले. त्यामुळे नागरिकांनी गाफील राहू नये, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत.