अमेरिकेत कोरोनाचं तांडव; 40 सेंकदाला एका रूग्णाचा मृत्यू, बेडही मिळेना
मुंबई (विशेष प्रतिनिधी)। हिवाळ्यानंतर जगभरात कोरोना व्हायरसने पुन्हा डोकं वर काढलं आहे. पुन्हा एकदा कोरोनामुळे अनेक देशाची बिकट परिस्थिती होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. जगातील कोरोनाच्या यादीत केंद्रस्थानी अमेरिकेतील पुन्हा चिंताजनक परिस्थितीत निर्माण होताना दिसत आहे. अमेरिकेत तब्बल 6 महिन्यानंतर सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. कोरोनाची रुग्णसंख्या अचानक वाढल्यानं अमेरिकेतील रुग्णालयांमध्ये नव्या रुग्णांसाठी बेडच शिल्लक राहिलेले नाहीत.
अमेरिकेतील ‘भयानक’ परिस्थिती-
अमेरिकेत मे नंतर सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात अमेरिकेत 2 हजार 157 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाले आहेत. गेल्या 24 तासात 40 सेंकदाला एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून, अमेरिकेतील परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. मंगळवारी अमेरिकेत 1 लाख 70 नवीन रुग्ण आढळून आले. हा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कोरोना उद्रेक झाल्यापासून आतापर्यंत अमेरिकेत 2 लाख 68 हजार 219 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 12.8 मिलियन नागरिक कोरोनाबाधित झाले आहेत. मंगळवारी मृत्यूच्या संख्येत झालेली वाढ 6 महिन्यानंतरची सर्वात मोठी वाढ आहे. एप्रिलमध्ये अमेरिकेत 24 तासांत 3 हजार 384 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती.
भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 कोटीजवळ–
भारतात सध्या 92,66,697 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. त्यापैकी 86,77,986 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकूण 1,35,261 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात अमेरिकेसारखी भयावह परिस्थिती नसली, तरी राजधानी दिल्लीत कोरोनाची लाट आली आहे तर इतर राज्यांमध्ये रुग्णांच्या संख्येनं मोठी उसळी घेतली आहे. त्यामुळे सरकारकडून पुन्हा एकदा काही प्रमाणात निर्बंध आणले जात आहे