मोठी बातमी:कोरोना नष्ट करण्याचा फॉर्म्युला,ओझोन गॅस; संशोधकांची माहिती !
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)। जगभर कोरोनाला आळा घालण्यासाठी संशोधन सुरू आहे. कोरोनाचे स्वरुप आणि त्याला प्रतिबंध करण्याकरता संशोधक दिवसरात्र झटत असतांना ओझोनची कमी सांद्रता (concentration) कोरोनाचे जीवाणू तटस्थ करू शकते, असे कोरोनावर मात करण्याचा एक नवीन मार्ग सापडल्याचा दावा जपानमधील संशोधकांनी केला आहे.
फुजिता हेल्थ युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. एका न्यूज कॉन्फरन्स दरम्यान,वैज्ञानिकांनी सांगितल्यानुसार, ओझोन गॅसच्या सहाय्याने रुग्णालये आणि वेटिंग रूमचे निर्जंतुकीकरण केले जाऊ शकते, ओझोन गॅसचे प्रति मिलियन (पीपीएम) ०.०५ ते ०.१ चे प्रमाण कोरोना विषाणूचा नाश करू शकते. यासह ओझोन वायूची ही पातळी माणसांसाठी धोकादायक नाही, असेही त्यांनी सांगितले. तसेच ओझोन एक प्रकारचा ऑक्सिजन रेणू आहे जो सूक्ष्मजंतूंना निष्क्रिय करण्यासाठी ओळखला जातो. पूर्वीच्या अनेक प्रयोगांनी हे सिद्ध केले आहे की, १ ते ६ पीपीएम दरम्यान ओझोनची उच्च प्रमाणातील सांद्रता कोरोना विषाणूविरूद्ध प्रभावी आहे, परंतु ओझोनची ही पातळी माणसांसाठी विषारी ठरली होती.
हे संशोधन करण्यासाठी जपानी वैज्ञानिकांनी ओझोन जनरेटरचा वापर केला. वैज्ञानिकांनी कोरोना विषाणूने भरलेल्या चेंबरमध्ये ओझोन जनरेटर लावला यावेळी शास्त्रज्ञांना असे आढळले की, १० तास कमी पातळीवर ओझोन गॅसच्या वापरामुळे कोरोना विषाणूची कार्यक्षमता ९० टक्क्यांहून कमी झाल्याचे स्पष्ट झाले होते. प्रमुख संशोधक ताकायुकी मुराता म्हणाले, ‘कमी सांद्रता ओझोनमुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्यापासून बचाव होऊ शकतो. त्या ठिकाणी कितीही लोक उपस्थित असले तरीही, कमी सांद्रता असणाऱ्या ओझोनचा उपचार कधीही केला जाऊ शकतो. तर उच्च आर्द्रतेच्या परिस्थितीत ते विषाणू विशेषतः प्रभावी असल्याचे आढळून आले असेही त्यांनी सांगितले. जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या नुकत्याच झालेल्या अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे की, ओझोन विविध संरक्षणात्मक उपकरणांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी प्रभावी ठरू शकते. फुजिता मेडिकल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलने कोरोना संक्रमण कमी करण्यासाठी ओझोन जनरेटर त्याच्या वेटिंग रूम आणि रूग्णांच्या खोलीत बसविला असल्याचे यावेळी जपानच्या संशोधकांनी सांगितले आहे.