दिल्ली बॉम्बस्फोट: ‘हा तर फक्त ट्रेलर’; आढळलेल्या चिठ्ठीमुळे खळबळ
मंडे टू मंडे वृत्तसंकलन। दिल्ली :
इस्रायली दूतावासाजवळ झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. एकीकडे दिल्लीत शेतकर्यांच्या हिंसक आंदोलनामुळे अगोदरच तेथे तणाव असताना या स्फोटामुळे दिल्ली पुन्हा हादरली आहे. त्यातच आता त्याठिकाणी पोलिसांना एक लिफाफा आढळून आला असून त्यात एक चिठ्ठी आढळली आहे. त्या चिठ्ठीत एक मजकूर लिहिण्यात आला असून त्या मजकूरामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्या चिठ्ठीत ‘हा तर फक्त ट्रेलर’ आहे, असा इशारा देण्यात आला आहे.
अब्दुल कलाम मार्गावरील इस्रायली दूतावासाच्या इमारतीपासून काही मीटर अंतरावर शुक्रवारी सायंकाळी ५.०५ मिनिटांनी स्फोट झाला. या स्फोटात कोणीही जखमी झाले नसून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन वाहनांच्या काचा फुटल्याचे समोर आले आहे. या घटनेचा तपास सुरु करण्यात आला असून या परिसरातील तीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. त्यामध्ये कॅब दिसत असून या कॅबमध्ये दोन लोकांना घटनास्थळी सोडले आणि नंतर त्याठिकाहून कॅब निघून गेल्याचे दिसत आहे. सीसीटीव्हीत ही माहिती मिळाल्यानंतर स्पेशल सेलने कॅब चालकाशी संपर्क केला असून दोन्ही व्यक्तींचे स्केच तयार केले आहेत.
जिंदाल हाऊस इस्रायल दूतावासापासून काही मीटर अंतरावर आहे. स्फोटानंतर काही वेळातच फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. या स्फोटात काळ्या पावडरचा वापर करण्यात आला होता, असे फॉरेन्सिक टीमकडून सांगण्यात आले. ही स्फोटके रस्त्याच्या कडेला लपवण्यात आली होती, असे ट्विट प्रसार भारती या वृत्तसंस्थेने केले होते.