मोदींसोबत अयोध्येत भूमिपूजनावेळी उपस्थित असलेल्या महंतांना कोरोनाची लागण !
मथुरा (वृत्तसंस्था)। राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांना कोरोनाची लागण झाली आहे. नृत्य गोपाळ दासांना श्वास घेण्यास त्रास होत होता. यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं आहे. नृत्य गोपाल दास यांना आता लखनऊच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नृत्य गोपाळ दास यांच्या उपचारासाठी आग्राचे सीएमओ आणि सर्व डॉक्टर दाखल झाले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महंत नृत्य गोपाल दास, त्यांचे समर्थक आणि मथुराचे जिल्हादंडाधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे. यासह मुख्यमंत्री योगी यांनी मेदांता रुग्णालयाचे डॉक्टर नरेश त्रेहन यांच्याशी चर्चा केली असून महंत नृत्य गोपाल दास यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा देण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, प्रत्येक श्रीकृष्ण जन्माष्टमी दरम्यान नृत्य गोपाल दास मथुरा येथे येतात. मथुरा दौर्यादरम्यान आज त्यांची प्रकृती खालावली. त्याला श्वास घेण्यात त्रास होत होता. यानंतर त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, अयोध्येत रामललाचे दोन पुजारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. याशिवाय बर्याच पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना संकट पाहता रामजन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात विशेष व्यवस्था करण्यात आली होती.