तिरुपतीच्या प्रसादात चरबी भेसळचा प्रकार समोर आल्याने अन्न, औषध प्रशासन अलर्ट मोडवर, आता “या” मंदिरांच्या प्रसादांचे नमुने घेणार
मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l देशामध्ये सध्या तिरुपती बालाजीच्या प्रसादावरुन रान उठले आहे. प्रसादामध्ये प्राण्यांची चरबी व माशांच्या तेलाचा वापर होत असल्याचे समोर आल्यानंतर भाविकांनी रोष व्यक्त केला. प्रसादासारख्या पवित्र पदार्थामध्ये देखील भेसळ समोर आल्यामुळे देशभरामध्ये या प्रकरणावर विशेषत: हिंदू धर्मात मोठी नाराजी पसरली. या नंतर आरोग्य मंत्रालय देखील जागे होत अलर्ट मोडवर आले आहे. मंत्रालयाकडून आदेश आल्यानंतर बनावट मिठाई आणि भेसळयुक्त तूप व खवा बनवणाऱ्या जागांवर छापेमारी करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळापूर्वी हे भेसळयुक्त मिठाई बनवण्यात येत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न समोर आला आहे.
तिरुपतीच्या पाश्र्वभूमीवर आता कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिरातील लाडू प्रसादाचे नमुनेही अन्न औषध प्रशासन कडून घेतले जाणार आहे. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी प्रसाद म्हणून सव्वादोन लाखाहून अधिक लाडू तयार करण्यात येणार आहेत.या सोबतच श्री जोतिबा मंदिरामध्ये लाडू प्रसादाचे भाविकांना वितरण केले जाणार आहेत. उत्सव काळात कीअही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून लाडू चे नमुने तपासणीसाठी घेतले जाणार आहेत.असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाळे यांनी सांगितले.
त्याचबरोबर उत्तराखंडमधील प्रमुख मंदिराच्या प्रसादाची चाचणी केली जाणार आहे. या चाचण्यांमध्ये केदारनाथ धाम, बद्रीनाथ धाम, गंगोत्री धाम, यमुनोत्री धाम आणि इतर मंदिरांसारख्या राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये प्रसादाचा नमुना घेण्यात येणार आहे. देशभरातून लाखो भाविक या मंदिरांना भेटी देत असतात. त्यामुळे आता तिरुपतीनंतर उत्तराखंडमधील मंदिरांमध्ये वाटण्यात येणारा प्रसाद हा पूर्णपणे शुद्ध आणि धार्मिक श्रद्धेनुसार असल्याची खात्री सरकारकडून करण्यात येणार आहे.