नरबळी दिल्याच्या संशयावरून सावदा पोलिस स्टेशनला ठिय्या, जादूटोणा विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करा – आंदोलकांची मागणी
सावदा, ता. रावेर. मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l दोन व्यक्तींसोबत हतनूर धरणावर गेलेल्या तरुणाचा हतनूर धरणाच्या नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. या तरुणाचा मृत्यू पाण्यात डूबुन झाला नसून हा नरबळी असल्याचा आरोप मयत तरुणाच्या नातेवाईकांनी केला असून या संदर्भात दोषींवर जादूटोणा विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणी साठी शेकडो महिला पुरुषांच्या जमावाने सावदा पोलिस स्टेशन आवारात ठिय्या आंदोलन सुरू केले.
या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की, सावदा येथील गुलाब सुरेश तायडे .वय २५ वर्ष रा. सावदा. ता. रावेर. हा तरुण सावदा येथून जवळच असलेल्या हतनूर धरण येथील तापी नदीपात्रात बुडाला होता. या तरुणाची शोधाशोध केली असता तो सापडून येत नव्हता अखेर या तरुणाचा मृतदेह रायपूर गावाजवळ तापी नदी पात्रात दि.२० रोजी सायंकाळी आढळून आला.
आज दी. २१ बुधवार रोजी गुलाब तायडे याच्यावर शोकाकुल वातावरणात सावदा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार करून परतून तसेच अंत्यसंस्काराला जाणारे सर्व व नातेवाईकांनी सकाळी १० वाजेपासून तर १ वाजेपर्यंत जवळ जवळ तीन तास दोषींवर गुन्हे दाखल करण्यासाठी सावदा पोलीस स्टेशन आवारात आक्रमक होत ठिय्या आंदोलन सुरू केले.
काय आहे प्रकरण?
स्वतः ला कालिंका मातेचा भक्त म्हणऊन घेणारा मांत्रिक, गुलाब तायडे या तरुणास कुठलेतरी आमिष देत हतनूर धरणावर घेऊन गेला. तेथे तापी नदी पात्रातील पाण्यात गुलाब यास डुबकी मारायला लावली मात्र तो वरच आला नाही. हा नरबळी दिल्याचा संशय नातेवाईकांना असून त्यांनी तसा आरोपही केला आहे.
नातेवाईकांनी आरोप केला आहे की, गुलाब याला दोन जण सोबत घेऊन गेले होते, त्यांचेवर अंधश्रद्धा निर्मूलन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नातेवाईकांनी करत सावदा पोलिस स्टेशन आवारात तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन सुरू केले.जो पर्यंत दोषींवर जादूटोणा विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत नाही तो पर्यंत इथून हटणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली.
शेवटी आंदोलकांशी व मयताचे नातेवाईकांशी चर्चा करून संबंधित दोषी व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येतील अशी खात्री सावदा पोलिसांकडून देण्यात आली.आंदोलकांना शांत करण्यासाठी सावदा पोलिस स्टेशन अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. सोबत निंभोरा व फैजपूर पोलीस स्टेशन येथील पोलिस कुमुक मागविण्यात आली होती.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा