काँग्रेस नेते अशोक चव्हाण-देवेंद्र फडणवीसांची गुप्त भेट; काँग्रेसला खिंडार पडणार?
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : एकीकडे काँग्रेसला खिंडार पडणार असल्याची चर्चा सुरू असतानाच काल काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) एकमेकांना भेटल्याची माहिती समोर आली असून यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंददाराआड चर्चाही झाल्याचं सांगितलं जातंय या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
भाजप पदाधिकारी व भाजप आणि शिंदे गटात समन्वयक आशिष कुलकर्णी यांच्या घरी गुरुवारी (ता. १ सप्टेंबर) अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे. फडणवीस हे कुलकर्णी यांच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी गेले हेाते. नेमके त्याचवेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण त्या ठिकाणी गेले हेाते. त्यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती समोर येत असून विशेष म्हणजे ही चर्चा राजकीय असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंददाराआड चर्चाही झाल्याचं सांगितलं जातं. अशोक चव्हाण हे काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याची आधीही चर्चा होती. त्यानंतर आता हे दोन्ही नेते एकमेकांना भेटल्याने या चर्चांना अधिक उधाण आलं आहे. काँग्रेसचे काही आमदार आणि माजी मंत्री भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा जोरदार चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठं खिंडार पडणार असल्याची चर्चा आहे. या भेटीवर काँग्रेस आणि भाजप नेत्यांनी मात्र मौन पाळले आहे.
फडणवीस आणि चव्हाण यांच्यातील भेट हा योगायोग होता की ठरवून केलेली गोष्ट आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीपासून काँग्रेस पक्षात धूसफूस असल्याचे दिसून येत होते. त्या निवडणुकीत काँग्रेसची तब्बल सातहून अधिक मते फुटल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच म्हटले होते. त्यामुळे काँग्रेसमधील एक गट फुटणार असल्याची चर्चा विधान परिषदेच्या निवडणुकीपासूनच राज्यात सुरू आहे. दरम्यान, काँग्रेसला भगदाड पडणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचा एक बडा नेता भाजपच्या संपर्कात असून येत्या काही दिवसात हा नेत्या आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. काँग्रेसचे काही आमदार आणि माजी मंत्रीही भाजपच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेनेपाठोपाठ आता काँग्रेसला मोठं खिंडार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, काँग्रेसमधील एक गट फुटणार असून दोन माजी मंत्र्यांना एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे सरकारचा आगामी विस्तार आक्टोबर महिन्यांत होणार असून त्यावेळी काँग्रेसमधील दोन बड्या नेत्यांचा त्यावेळी शपथविधी होणार असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.