देवेंद्र फडणवीस होणार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष?
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पक्षात लवकरच मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती मिळत असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून त्याला ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती आहे. आताचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्याने नवीन अध्यक्षांची नेमणूक केली जाणार आहे. नवीन अध्यक्षांची जवाबदारी आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर दिली जाणार असल्याची माहिती सूत्रां कडून देण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेले फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे असून त्यांचे विश्वासू असून त्यांची पक्षावर घट्ट पकड आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षासाठी महाराष्ट्रातून विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस ही दोन नावे चर्चेत होती. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने फडणवीस यांना पक्षाध्यक्ष करण्यास अनुकूलता दर्शवली असल्याने देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे
भाजप नेते उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष झाले तरी आणि लोकसभेत राज्यात भाजपला अपयश आले असले तरी आगामी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्यांची महत्वाची जबाबदारी असणार आहे. कारण विधानसभेचे रण जिंकण्यात फडणवीसच महत्वाची भूमिका बजावू शकतात. या पूर्वी त्यांनी अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या असल्याने राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली जात आहे.