50 हजार रुपये लाच देऊन PhD ची पदवी मागणाऱ्या शिक्षकास ACB कडून अटक
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
धुळे,मंडे टू मंडे वृत्तसेवा। पीएचडी पदवी मिळवण्यासाठी मार्गदर्शकास 50 हजार रुपये लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकाला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहे.
ही कारवाई धुळे शहरातील नगाव बारी चौफुली जवळील एका हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुकेंद्र वळवी याला लाच देताना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पीएचडीचे मार्गदर्शक असलेल्या तक्रारदारास पन्नास हजारांची लाच देऊ केली.
तक्रारदाराची इच्छा नसताना देखील शिक्षक वळवी यांच्याकडून तक्रारदाराला वारंवार लाच घेण्यासंदर्भात बोलणे सुरू होते. त्यास विरोध केल्यानंतर देखील शिक्षक वाळवी हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.अखेर तक्रारदार यांनी धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क करून या संदर्भात तक्रार दिली.
त्यानुसार लाचलुचपत विभागाच्या पथकाने धुळ्याच्या नगाव बारी परिसरात असलेल्या हॉटेल बालाजी येथे सापळा लावला. यानंतर ठरल्याप्रमाणे सुकेंद्र वळवी हे पीएचडीचे मार्गदर्शक तथा तक्रारदार यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध 50 हजार रुपयांची लाचेची रक्कम देत असताना वळवी यांना रंगेहात पकडण्यात आले.
लाच देणार्या शिक्षका विरोधात देवपूर पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास देवपूर पोलिस व लाचलुचपत विभागातर्फे करण्यात येत आहे.