माजी खासदारासह जिल्हाधिकारी, वरिष्ठ अधिकारी अशा १२ जणांविरोधात गुन्हा दाखल
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
धुळे,मंडे टू मंडे वृत्तसेवा। माजी खासदार, जिल्हाधिकारी आणि अनेक वरिष्ठ अधिकारी अशा १२ जणांविरोधात न्यायालयाच्या आदेशाने साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
नागपूर सुरत महामार्गावर साईबाबा हायवे सर्व्हिस, हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन यांच्या माध्यमातून १९८८ मध्ये दहिवेल परिसरात एक पेट्रोल पंप सुरू करण्यात आला. मात्र या पेट्रोल पंपासाठी बनावट कागदपत्रे दिल्याची तक्रार सामाजिक कार्याकारे तुकाराम निंबा मासुळे यांनी न्यायालयात केली. खोटे पुरावे कंपनीस सादर करून पेट्रोल पंप मिळवण्यात आला. ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. त्यानुसार न्यायालयाने सिआरपीसि १५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
‘ही’ बोगस व बनावट दस्तऐवज तयार केली पेट्रोल पंपाच्या रिटेल मंजुरीसाठी व सुरू करण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या, नाहरकत दाखले, महसूल रेकॉर्ड, विद्युत कनेक्शन, विस्फोटक पदार्थ अधिनियमान्वये लागणारे तपासणी अहवाल, तसेच हरकती या बोगस व बनावट दस्तऐवज तयार करून तसेच खोट्या फेरफार नोंदी तयार करून तयार करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
यांच्याविरुद्ध दाखल झालाय गुन्हा माजी खासदार बापू चौरे, हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन चे तत्कालीन मॅनेजर, तत्कालीन विभागीय व्यवस्थापक, वीज कंपनीचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अभियंता, तत्कालीन पोलीस अधीक्षक, साक्री पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक, तत्कालीन जिल्हाधिकारी, तत्कालीन तहसीलदार, तत्कालीन मंडळ अधिकारी, तत्कालीन तलाठी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता तसेच राष्ट्रीय महामार्गाची तत्कालीन कार्यकारी अभियंता यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त ‘पुढारी’ने दिले आहे.