महिला ग्रामसेविकेला १५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l प्रलंबित बिले अदा करण्यासाठी १५ हजार रुपयाची लाच स्वतच्या घरी स्वीकारताना धुळे जिल्ह्यातील चौगाव बुद्रुक येथील ग्रामपंचायत महिला ग्रामसेविका राजबाई पाटील यांना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
तक्रारदार यांनी ग्रामपंचायत चौगांव बु.येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम घेवून ते काम पूर्ण केले. सदर कामावर झालेल्या खर्चाचे बिल तक्रारदार यांना अदा करण्यात आले होते. तसेच तकारदार यांनी मौजे चौगांव बु.येथे रस्ता सिमेंट कॉक्रीटीकरणाचे काम केले असून त्या कामाकरीता झालेल्या खर्चाचे बिल त्यांना अदा करण्यात आलेले नव्हते. म्हणुन तक्रारदार यांनी सुमारे १ महिन्यापुर्वी ग्रामसेविका राजबाई पाटील यांची भेट घेवुन त्यांनी केलेल्या रस्ता सिमेंट कॉकीटीकरणाच्या कामावर झालेल्या खर्चाचे बिल अदा करण्याची विनंती केली.
ग्रामसेविका राजबाई पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे रस्ता कॉकीटीकरणावर झालेल्या खर्चाचे बिल काढण्याकरीता तसेच त्यांनी यापूर्वी केलेल्या पेव्हर ब्लॉकच्या कामाचे बिल काढून दिल्याचे मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे २५ हजार रुपये लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदार याना पैसे द्यायचे नसल्याने तक्रारदार यांनी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे दि. ४ एप्रिल २०२४ रोजी तकार दिली होती. सदर तक्रारीची पडताळणी केली असता ग्रामसेविका राजबाई पाटील यांनी तकारदार यांच्याकडे २५ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती १५ हजार रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केले होते. त्या नुसार आज सोमवार दि.१५ एप्रिल रोजी सापळा रचून कारवाई दरम्यान तक्रारदार यांचेकडुन १५,०००/- रुपये लाचेची रक्कम ग्रामसेविकेला शिंदखेडा येथील तिचे राहते घरी स्वत: स्विकारतांना रंगेहात त्यांना पकडण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली. या बाबत शिंदखेडा पो.स्टे.येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधिक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, प्रविण पाटील,संतोष पावरा, प्रविण मोरे,रामदास बारेला, प्रशांत बागुल, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर, मपोकॉ. दिपाली सोनवणे या पथकाने केली आहे.