वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह दोघं हवालदार एसीबी च्या जाळ्यात
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l तुम्हाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात येईल ही हद्दपारीची कारवाई टाळण्यासाठी तडजोडीअंती पोलिस कर्मचार्याच्या माध्यमातून दिड लाखांची लाच स्वीकारल्यानंतर धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय सखाराम शिंदे. सम्राट चौक, शाहू कॉम्प्लेक्स, फ्लॅट नं. 2, बीड. व पोलीस हवालदार नितीन आनंदराव मोहने पो.हवालदार, 334 रा. प्लॉट नंबर 58, गंदमाळी सोसायटी, देवपूर, धुळे. तसेच पोलीस हवालदार अशोक साहेबराव पाटील. वय 45 वर्ष. पो.हवा. 1629.स्थानिक गुन्हे शाखा वर्ग 3 . प्लॉट नंबर 25, मधुमंदा सोसायटी, नकाने रोड, देवपूर, धुळे. यांना धुळे एसीबीने अटक केल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. धुळे जिल्ह्याच्या इतिहासात गुन्हे शाखेच्या निरीक्षकांवर लाच प्रकरणात कारवाई झाल्याची ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील 35 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, ते राजकीय व सामाजिक कार्यकर्ता आहेत. राजकीय सहकार्यांशी मतभेद झाल्याने त्यांच्याविरोधात दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल आहे. या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार नितीन मोहने व पोलीस हवालदार अशोक पाटील यांनी तक्रारदार यांची भेट घेतली व तुमच्यावर गुन्हे दाखल असल्याने गुन्ह्यांची माहिती काढून लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशनकडुन प्रस्ताव मागवून तुम्हाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात येईल मात्र कारवाई होवू द्यायची नसेल तर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे साहेबांना दोन लाख रुपये द्यावे लागतील असे सांगून तक्रारदाराला पोलीस निरीक्षक शिंदे यांची भेट घेण्यास सांगितले.
35 वर्षीय तक्रारदाराने 1 एप्रिल रोजी धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर धुळे येथील स्थानिक गुन्हे शाखेत जावून लाच पडताळणी केल्यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय सखाराम शिंदे यांनी तक्रारदाराकडून पंचांसमक्ष दोन लाख रुपये लाचेची मागणी करुन रक्कम पोलीस हवालदार नितीन आनंदराव मोहने व अशोक साहेबराव पाटील यांना देण्यास सांगितले. तक्रारदाराने दोन्ही कर्मचार्यांशी संपर्क साधला असता त्यांनी तडजोडीअंती दिड लाखांची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले व सोमवारी सायंकाळी दोंडाईचा येथील धुळे रस्त्यालगत असलेल्या जैन मंदिरा समोरील मोकळ्या जागेत लाचेची रक्कम स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षकांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारण्यात आल्याचे एसीबीच्या चौकशी निष्पन्न झाल्यानंतर रात्री उशिरा पोलीस निरीक्षक शिंदे यांना अटक करण्यात आली.
ही कारवाई नाशिक पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रवीण मोरे, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे.