डिजिटल वोटर कार्ड, निवडणूक आयोगाची मतदारांसाठी मोठी घोषणा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नवी दिल्ली (वृत्तसेवा)। मतदान दिनाला निवडणूक आयोग मतदारांसाठी मोठी घोषणा करणार आहे. 25 जानेवारीला देशात डिजिटल वोटर कार्ड लाँच केलं जाणार आहे. मतदार हे डिजिटल वोटर कार्ड आधार कार्डप्रमाणे डाउनलोड करू शकतो. निवडणूक आयोगाकडून सोमवारी इलेक्ट्रॉनिक इलेक्टर्स फोटो आयडेंटिटी ऍप लाँच केलं जाईल.
ई-इपिकच्या वापरासाठी खास प्रक्रिया आणि काही नियमांचं पालन करावं लागेल. डिजिटल वोटर कार्डसाठी मतदाराला आपल्या संपूर्ण माहितीची पडताळणी करावी लागेल. मतदाराच्या मोबाईल नंबरसह, त्याचा ईमेल आयडीही देणं अनिवार्य आहे. प्रक्रियेअंतर्गत मतदाराचा मोबाईल नंबर निवडणूक आयोगाच्या मतदार यादीमध्ये नोंदवल्यानंतर, त्याला एका ऍपद्वारे मेल आणि फोनवर मेसेज मिळेल. यात सुरक्षेच्या दृष्टीने पासवर्ड आणि ओटीपीची सुविधाही असणार आहे. दोन क्यूआर कोडही असणार आहेत. यात वोटर्सची संपूर्ण माहिती आणि त्याच्या भागाची माहिती असणार आहे.
निवडणूक आयोगाने वोटर आयडी कार्डच्या हार्ड कॉपीचाही पर्याय ठेवला आहे. त्यासाठी 25 रुपये शुल्क भरावं लागेल. या डिजिटल सुविधेमुळे कार्ड हरवण्याची नंतर पुन्हा मिळवण्याच्या समस्येपासून सुटका होणार आहे.