ब्रेकिंग : कोविड रुग्णालयात दाखल होण्याच्या नियमात बदल; मोदी सरकारचा मोठा निर्णय
Monday To Monday NewsNetwork।
नवी दिल्ली,(वृत्तसंस्था)।कोणत्याही रुग्णास कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर सुरुवातीला त्या रुग्णाची कोरोना चाचणी केली जाते. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केलं जातं. पण आता कोविड सेंटरमध्ये दाखल होण्यासाठी रुग्णाची कोरोना चाचणी बंधनकारक नसणार आहे. मोदी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांना रुग्णालयात भरती होण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. याबाबत नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. कोविड रुग्णालयात किंवा सेंटरमध्ये दाखल होण्यासाठी आता कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असणं बंधनकारक नसेल, असं केंद्राने सांगितलं आहे.कोरोनाच्या संशयित रुग्णांना संशयित रुग्णांच्या वॉर्डमध्ये ठेवावं. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही रुग्णाला आवश्यक औषधं, ऑक्सिजन अशी अत्यावश्यक सेवा देण्यास नकार देऊ नये. तो रुग्ण दुसऱ्या शहरातील असला तरी त्याला या सेवा मिळायला हव्यात. रुग्ण आपलं ओळखपत्र दाखवू शकला नाही तरी त्याला रुग्णालयात भरती करण्यास नकार देऊ नये, असं केंद्राने स्पष्ट केलं आहे. रुग्णालयातील भरती गरजेनुसार असावी, असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत.
रुग्णाच्या कोरोना निदानासाठी आरटी-पीसीआर टेस्ट केली जाते. पण या चाचणीचा रिपोर्ट येईपर्यंत खूप वेळ जातो. कधीकधी रुग्णाची प्रकृती इतकी गंभीर असते, ही रिपोर्ट येण्याआधीच वेळेत उपचार न मिळाल्याने त्या रुग्णाचा मृत्यू होतो. त्यामुळे मोदी सरकारने घेतलेला हा निर्णय खूप मोठा आहे. यामुळे अनेक कोरोना रुग्णांना वेळेत उपचार मिळून त्यांचा जीव वाचवण्यास मदत होणार आहे.