शिवसेनेच्या शाखांचीही फाळणी; शिंदे-ठाकरे एकाच शाखेचे दोन गट
डोंबिवली, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : शिवसेनेच्या डोंबिवली मध्यवर्ती शाखेवर शिंदे आणि ठाकरे समर्थकांच्या राडेबाजीनंतर डोंबिवली मध्यवर्ती शाखेचे शिंदे आणि ठाकरे गटात विभाजन झाल्याचे पहायला मिळत आहे. येथील शाखेमध्ये चार खोल्या असून यातील मध्यभागी असलेल्या दोन खोल्यांवर शिंदे गटाने ताबा घेतला आहे. दोन खोल्या या ठाकरे समर्थकांच्या ताब्यात आहेत.
यामध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय असून त्याबाजूला बैठक खोली आहे. या दोन्ही कार्यालयांवर शिंदे गटाने ताबा मिळविला आहे. तर सुरुवातीची आणि शेवटची अशा दोन खोल्या या ठाकरे समर्थकांच्या ताब्यात आहेत. दोन ते तीन समर्थक केवळ शाखांत बसलेले असून पोलिसांचा देखील खडा पहारा शाखेच्या बाहेर आहे. जोपर्यंत कोणताही निर्णय होत नाही, तोपर्यंत शांततेची भूमिका सध्या दोन्ही गटांनी घेतल्याचे चित्र शाखेत दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो या शिवसेना शाखेतून काढण्यात आले होते. यामुळे शिंदे गटाचे समर्थक आक्रमक झाले आणि शिंदे समर्थकांनी शाखेत घुसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला. या वेळी यावेळी महिला शिवसैनिक, तरूण आणि पुरुष शिवसैनिकांनी शिंदे समर्थक कार्यकर्त्यांना विरोध दर्शवला. तो विरोध करत असताना शिवसैनिक आणि शिंदे समर्थक आपआपसात भिडले होते मंगळवारी हा सर्व प्रकार झाला.