मुक्ताईनगरात ठाकरे-शिंदे गटात राडा : नगरसेवकांसह तिघांवर गुन्हा दाखल
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी : राज्याच्या राजकारण उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष तापला असताना मुक्ताईनगरात या दोन्ही गटात वाद निर्माण झाल्याचे पहायला मिळत असून शिंदे गटांचे समर्थक नगरसेवकासह तिघांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात भाग्यश्री अजय जैन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मुक्ताईनगरात काल रात्री उशीरा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्याच्या घरावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. अजय जैन यांच्या पत्नी भाग्यश्री अजय जैन यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. जैन यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश केला होता. काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्या आपल्या कुटुंबियांसह देवी विसर्जन मिरवणूक पहात होत्या. याप्रसंगी नगरसेवक राजू हिवराळे व त्यांच्या सहकार्यांनी जुन्या वादातून त्यांचे पती अजय जैन यांच्याशी हुज्जत घातली.
पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला. नंतर काल रात्री सव्वाबाराच्या सुमारास राजू हिवराळे आणि इतरांनी अजय जैन यांच्या घराजवळ येऊन त्यांना शिवीगाळ केली. त्यांनी दगडफेक करण्यास प्रारंभ केला. यामुळे अजय जैन यांनी स्वरक्षणार्थ कुंडी फेकल्यानंतर त्यांनी पुन्हा जोराने दगडफेक केली. यामुळे जैन दाम्पत्य घरात गेले. त्यांनी रोहिणी खडसे यांना फोन लाऊन माहिती दिली.
थोड्या वेळाने पोलीस आल्यानंतर हे लोक निघून गेले. दरम्यान, या दगडफेकीत अजय जैन यांच्या घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नगरसेवक राजेंद्र सुकदेव हिवराळे उफॅ राजू डॉन; बाळा सुभाष चिंचोले व विकास जुमळे या तिघांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात भादंवि कलम १४३, १४७, ४२७, ५०४, ३७ (१); ३७ (३); १३५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.