डॉक्टरांना शिवीगाळ करत धक्काबुक्की, ७ जणांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जखमी रुग्णावर उपचार करीत असताना नातेवाईक व इतरांनी रुग्णालयात गोंधळ घालत थेट वैद्यकीय अधिकाऱ्यांची कॉलर पकडून शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. सदरील प्रकार शुक्रवार रोजी मध्यरात्री च्या सुमारास जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घडला. या प्रकरणी सहा ते सात जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
राहुल अशोक शिंदे या तरुणावर जुन्या भांडणाच्या कारणावरून दि. ७ मार्च रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास काट्याफाईल भागात मारहाण करण्यासह त्याच्यावर वार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
तेथे मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास उपचार सुरू असताना जखमी राहुल शिंदे याचे सोबत आलेले नातेवाईक व मित्रां पैकी काही जण खासगी रुग्णालयात घेऊन जाण्या विषयी तर काही जण लवकर उपचार करा, असे म्हणत शिवीगाळ करू लागले. एक जण मोबाईलमध्ये शुटींग करीत असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिनयकुमार यांनी याविषयी विचारणा केली असता पाच ते सहा जण डॉक्टर व नर्सिंग स्टॉफच्या अंगावर धावून आले व धक्काबुक्की केली. यातील एकाने डॉ. अभिनयकुमार यांची कॉलर पकडली. गोंधळ वाढत असताना जखमीचे नातेवाईक व मित्र ऐकण्याच्या परिस्थितीत नसल्याने जिल्हापेठ पोलिसांना माहिती देण्यात आली.
या संदर्भात डॉ. अमोल पाटील यांनी फिर्याद दाखल केल्याने जिल्हापेठ पोलिस स्टेशनला सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी मनोज उर्फ रवींद्र जयवंत शिंदे. (वय ३० वर्ष. रा. चौघुले प्लॉट) व सुमीत सुनील महाजन. (वय २४ वर्ष. रा. शिवाजीनगर) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.