मानव निर्मित तलावात बुडून दोन भावांचा मृत्यू, मुक्ताईनगर तालुक्यातील घटना,परिसरात शोककळा
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज,प्रतिनिधी | मुक्ताईनगर परिसरातील मानव निर्मित उत्खननामुळे तयार झालेल्या तलावात तालुक्यातील सालबर्डी येथील दोन भाऊ तलावात पाय घसरून पडल्याने बुडून मरण पावल्याची दुर्घटना आज रोजी घडली. दोघी भाऊ अल्पवयीन असून परिसरावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सालबर्डी येथे कृष्णा गोपाळ ढाके हे आपली पत्नी व दोन मुलांसह रहात असून आज दि. १३ ऑक्टोबर रविवार रोजी दुपारच्या वेळी त्यांची दोन मुले वेदांत कृष्णा ढाके. वय १५ वर्ष. हा इयत्ता नववीत शिकत होता. व चिराग कृष्णा ढाके. वय १० वर्ष. हा इयत्ता पाचवीत शिकत होता. ही दोन्ही मुले सालबर्डी शिवारात बकऱ्या चारण्यासाठी गेले असता यातील चिराग हा शिवारातील तलावा जवळ
बकऱ्या चारत असतांना त्यांचा पाय घसरून तो तलावात पडला, त्याला पोहता येत नसल्याने तलावातील पाण्यात तो गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी त्याचा भाऊ वेदांत याने देखील पाण्याची उडी मारली. दुर्दैवाने पाण्यात खोलीचा अंदाज न आल्याने दोन्ही भाऊ तलावात बुडले.
या घटने बद्दलची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अवैध उत्खननाचे बळी
सालबर्डी शिवारात मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्यामुळे मोठं मोठे खड्डे पडून मानव निर्मित तलाव झाले असून पावसाळ्याचे दिवस असल्याने या मोठं मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. आणि याच तलावाने दोन अजाण बालकांचा बळी घेतला आहे.
ढाके कुटुंब हे सालबर्डी येथे मजुरी करून उदनिर्वाह चालवतात. वडील कृष्णा गोपाळ ढाके हे रिक्षा चालवतात तर आई शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात. मानव निर्मित तलावात दोन्ही मुलांचा बुडून मृत्यू झाल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पडला असून परिसरातून हळहळ परिसरात शोककळा पसरली आहे. या संदर्भात पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरू होते.