शिवमहापुराण कथे दरम्यान फैजपुर येथून उद्यापासून सात दिवस अवजड वाहनांना ‘नो एंट्री’, बस सह लहान वाहनांच्या मार्गातही बदल
फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | भुसावळ ते फैजपूर रस्त्यावर अकलूद शिवारात १० मार्च पासून शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे.त्या निमित्त फैजपूर येथे १० ते १६ मार्च दरम्यान होणाऱ्या पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल आल्याची अधिसूचना जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी ८ मार्च रोजी काढली. या बदलामुळे फैजपूर परिसरात अवजड वाहनांना बंदी राहणार असून, बसेससह लहान वाहनेही अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहे.या मार्गावरील सार्वजनिक व खासगी वाहनांची वर्दळ लक्षात घेता वाहतूक मार्गात तात्पुरत्या स्वरूपात बदल केला आहे.
२४ तास अवजड वाहनांना बंदी
कार्यक्रम स्थळापासून जाणाऱ्या मार्गावरून बसेस, कार, रिक्षा, दुचाकी यांना ठरावीक वेळेत बंदी असली तरी अवजड वाहनांना २४ तास बंदी घालण्यात आली आहे. १० ते १६ मार्च दरम्यान दररोज सकाळी ८ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी मिळणारे सर्व रस्ते व उपरस्त्यांवरून सर्व प्रकारच्या वाहनांना ठरवून दिलेल्या वेळेत प्रवेश बंद करण्यात आला आहे.
वाहतूक मार्गात बदलानंतर रावेरहून येणारी अवजड वाहने, चोपडा-यावलकडून भुसावळकडे जाणारी वाहने तसेच भुसावळहून फैजपूरकडे जाणारी अवजड वाहने जळगावातून किनगावमार्गे फैजपूरकडे जाणार असल्याने जळगाव परिसरात वाहतुकीची वर्दळ वाढणार आहे. बायपास सुरू झाल्याने ही वाहतूक तिकडून जाऊ शकते, त्यामुळे शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील ताण कमी होण्यास मदत होईल.
असा राहणार बदल
• भुसावळ ते फैजपूर मार्गावरील हॉटेल रिव्हर पॉइंट ते भोरटेक फाटापर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद
• भुसावळकडून फैजपूरकडे जाणाऱ्या बसेस, कार, रिक्षा, दुचाकी अकलूद जुना टोल नाक्यापासून यावलमार्गे वळवून फैजपूरकडे जातील. तसेच तिकडून येणारी ही वाहने याच मार्गे भुसावळ येथील तापी नदीपुलावरून येतील.
• रावेर, सावदा, फैजपूरमार्गे भुसावळकडे येणाऱ्या बस, कार, रिक्षा, दुचाकी सावदा येथून वळवून हतनूर-बोहर्डी फाटामार्गे भुसावळकडे येतील.
• रावेर, सावदा, फैजपूरमार्गे येणारी अवजड वाहने यावल, किनगावमार्गे जळगाव व भुसावळकडे येतील.
• चोपडा, यावलकडून भुसावळकडे जाणारी वाहने धानोरा फाटा येथून वळवून डांभूर्णीमार्गे जळगावकडून भुसावळकडे जातील.
• भुसावळकडून फैजपूरकडे जाणारे अवजड वाहने जळगाव, डांभुर्णी, किनगाव, यावलमार्गे फैजपूरकडे जातील.
हा वाहतूक बदल कथा काळापुरता मर्यादित असेल.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

