नाशिक मध्ये भूकंप : २४ तासात ४ भूकंपाचे धक्के
नाशिक, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | नाशिक वर नवीन संकट ओढवलं आहे. नाशिक जिल्ह्यात भूगर्भातील हालचालींनी प्रशासनाची चिंता वाढवली आहे.नाशिक मधील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल परिसरात गेल्या २४ तासांत तब्बल ४ वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. हे भूकंपाचे धक्के सौम्य जरी असले तरी मात्र चिंता वाढवणारे आहेत. यात कुठलीही जीवित हानी झालेली नसली तरी वारंवार होणाऱ्या या कंपनांमुळे हरसूल परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नाशिक मधील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल आणि आजूबाजूच्या गावांमध्ये जमिनीच्या पोटातून गूढ आवाज येत असून त्यानंतर सौम्य धक्के जाणवत आहेत. हे धक्के जरी सौम्य असले तरी २४ तासांत ४ भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिक अस्वस्थ असून ही नाशिककरांसाठी व प्रशासनासाठी चिंतेची बाब आहे. सुदैवाने, या धक्क्यांमुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी किंवा घरांचे मोठे नुकसान झालं नाही. भूकंपाच्या या धक्क्यांची माहिती मिळताच स्थानिक महसूल प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क झाला आहे.
भूकंपाची तीव्रता ?
हे भुकंपाचे धक्के नेमके किती रिश्टर स्केलचे होते, याची अधिकृत माहिती भूकंप मापन केंद्राकडून घेतली जात आहे. भूकंप तज्ज्ञांच्या मते, भूगर्भातील खडकांमध्ये होणाऱ्या हालचालींमुळे किंवा ‘टेक्टोनिक प्लेट्स’मधील घर्षणामुळे असे सौम्य धक्के बसू शकतात. हरसूल परिसरात यापूर्वीही अशा प्रकारचे धक्के बसले आहेत. मात्र एकाच दिवसात चार वेळा धक्के बसणे हा चर्चेचा आणि तपासाचा विषय ठरला आहे.


