आंबे खातायं…सावधान ! आंबे पिकवण्यासाठी घातक रसायनांचा वापर, तुम्ही आंबा खातायं, की विष! कसा ओळखायचा केमिकल्सचा आंबा
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आंबा म्हटलं की, तोंडाला पाणी सुटलं. उन्हाळ्यात बाजारात गेलं की, चोहीकडे फक्त आंबेच दिसतात. रसरशीत, पिवळ्या धम्मक आंब्याची गोड फोड जीभेवर ठेवली की, जीवन अगदी सार्थकी लागल्यासारखं वाटतं. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का? की हे हवेहवेसे वाटणारे आणि ताजे दिसणारे आंबे बनावट, विषारी असू शकतात? घाबरलात ना? थांबा गोंधळू नका… सविस्तर समजून घ्या…
तामिळनाडूमधील अन्न सुरक्षा विभागानं एका गोदामातून, एक, दोन नव्हे तर तब्बल 7.5 टन विषारी आंबे जप्त केले आहेत. आता प्रश्न असा आहे की, हे विषारी आंबे कोणते आहेत? ते कसे बनवले जातात आणि जर हे आपण खाल्ले तर काय होऊ शकतं?
विषारी आंबा दिसतो कसा?
विषारी आंबा म्हणजे, हा आंबाच असतो. हे झाडावरचं फळच असतं. पण कृत्रिम पद्धतीनं पिकवलेलं असतं. हे आंबे झाडावरच येतात. ते झाडावरुन तोडले जातात. पण कृत्रिम पद्धतीनं म्हणजेच, रसायनांचा वापर करुन पिकवले जातात. कृत्रिम पद्धतीनं पिकवल्यामुळे आणि घातक रसायनांचा वापर केल्यामुळे त्यांना विषारी आंबे म्हटलं जातं. आंबा हा इथेलिन स्प्रे मारूनही पिकविला जातो. हे भयानक केमिकल असून आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. आंबा शैकिनांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे.
दरम्यान, आंबा पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर केला जातो. महत्त्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे, कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावर बंदी आहे. कॅल्शियम कार्बाइड हे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. त्यामुळे कॅल्शियम कार्बाइडचा वापर करुन पिकवलेले आंबे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात.
विषारी आंबे कसे पिकवले जातात?
विषारी आंबे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर केला जातो. कॅल्शियम कार्बाइड बाजारात सहज उपलब्ध होतं. हार्डवेअरच्या दुकानातून अगदी सहज कॅल्शियम कार्बाइड खरेदी करता येतं. कॅल्शियम कार्बाइड हा एक प्रकारचा दगड आहे. अनेकजण याला चुनखडी असं देखील म्हणतात. कॅल्शियम कार्बाइडनं आंबे शिजवण्यासाठी कच्च्या आंब्यांमध्ये एका कापडात गुंडाळून ठेवलं जातं.
कॅल्शियम कार्बाइड कापडात गुंडाळून आंब्यांभोवती ठेवल्यानंतर आंब्याची टोपली किंवा पेटी एखाद्या जाड कापडानं किंवा पोत्यानं बंद करुन ठेवली जाते. त्यानंतर तीन ते चार दिवस वारा नसलेल्या ठिकाणी ठेवतात. त्यानंतर ती पेटी उघडल्यानंतर सर्व आंबे पिकलेले असतात. असं होतं की, जेव्हा कॅल्शियम कार्बाइड आद्रतेच्या संपर्कात येतं, त्यावेळी एसिटिलीन वायू तयार होतो. ज्यामुळे फळं पिकतात. त्यामुळे झाडावर आंबे पिकण्याची वाट पाहावी लागत नाही. आरोग्यासाठी घातक असलेल्या कॅल्शियम कार्बाइडचा वापर करुन झटपट आंबे पिकवले जातात. आंबे पिकवण्यासाठी सर्रास वापरल्या जाणाऱ्या कॅल्शियम कार्बाइडचा वापर मेटल कटिंग आणि स्टील उत्पादनात केला जातो
केमिकल्सनी पिकवलेला आंबा कसा ओळखायचा? ‘हे’ ५ सोपे उपाय
फळांचा राजा कोण? तर नाव घेण्यापूर्वीच आपल्या तोंडाला पाणी सुटतं. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या की, घरातली चिल्ल्यापिल्ल्यांचं लक्ष घरात येणाऱ्या आंब्याच्या पेट्यांकडे लागतं. गोड, रसाळ आंबा कदाचितच कोणाला आवडत नसेल. आंब्याचेही अनेक प्रकार आहेत. पण त्यातल्या त्यात देवगडच्या हापूस आंब्याला देश-विदेशातून मोठी मागणी असते. पण हल्ला बाजारात येणाऱ्या आंब्यांवर अगदी सर्रास केमिकल्सचा वापर केला जातो. आंबा लवकर पिकवण्यासाठी, तसेच, रसाळ दिसण्यासाठी त्यावर अनेक केमिकल्सचा भडिमार केला जातो. आंब्यावर फवारली जाणारी रसायनं आबा लवकर पिकवण्यासाठी फायदेशीर ठरतात खरी, मात्र तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरतात. अशा परिस्थिती केमिकल्स विरहित आंबा ओळखणं तसं पारसं कठिण होऊन जातं. आज आम्ही तुम्हाला केमिकल्सनी पिकवलेला आंबा कसा ओळखावा.
रासायनिक पद्धतीनं पिकवलेल्या आंब्यांमध्ये अनेकदा कॅल्शियम कार्बाइड नावाचं रसायन असतं. त्यामुळे पोटात गॅस, पोट फुगणं आणि जुलाब होऊ शकतात. आंब्याबाबतच्या अनेक संशोधनांनुसार, रासायनिक पद्धतीनं पिकवलेल्या आंब्याचं जास्त सेवन केल्यानं कर्करोगाचा धोका वाढतो. या आंब्यांमध्ये जीवनसत्त्व आणि खनिजांचं प्रमाण कमी असतं आणि हानिकारक विषारी पदार्थांचं प्रमाण जास्त असतं, ज्यामुळे हृदयविकार, मधुमेह आणि किडनीचं आजार उद्भवू शकतात. कधीकधी कीटकनाशकांमुळे त्वचेच्या अॅलर्जीचा धोका असतो. रासायनिक पद्धतीनं पिकवलेल्या आंब्यांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक तत्वांचे प्रमाण नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्याच्या तुलनेत कमी असते. रासायनिक पद्धतीनं पिकवलेले आंबे खरेदी करतानाच ओळखता येणं शक्य आहे. कसं ते जाणून घेऊयात…
रंग ओळखा
साधारणतः सर्वचजण आंब्याचा रंग पाहून खरेदी करतात. याच रंगावरुन तुम्ही आंबा केमिकलचा वापर करुन पिकवलेला आहे की, नाही हे ओळखता येतं. आंबा जर नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेला असेल, तर तो हलक्या पिवळ्या रंगाचा किंवा हिरवा असतो. केमिकलनं पिकवलेले आंबे पिवळे असतात, तसेच त्यावर हिरवे चट्टे दिसून येतात.
निशाण पाहा
आंब्यावरील खुणाही त्यावर केमिकल्सचा वापर केलाय की नाही हे ओळखण्यासाठी मदत करतात. काही आंब्यांवर त्वचेच्या छिद्रांसारख्या अनेक निळ्या, काळ्या किंवा पांढऱ्या खुणा असतात. असे आंबे विकत घेऊ नका. या खुणा आंब्यावर करण्यात आलेल्या अति केमिकल्सच्या भडिमारामुळे होतं.
बाधलीत टेस्ट करा
आंबा खरेदी केल्यानंतरही तुम्ही अनेक सोप्या चाचण्या करून केमिकल शोधू शकता. घरी आणलेले सर्व आंबे पाण्यानं भरलेल्या बादलीत ठेवा. जे आंबे पाण्यात स्थिरावतील, ते नैसर्गिकरित्या पिकलेले असतील. तसेच, जे आंबे वर तरंगणारे आहेत, ते रसायनांचा वापर करुन पिकवलेले असतील.
सुगंध महत्वाचा
आंब्याचा गंध खूप महत्त्वाचा आहे. रसायनांनी पिकवलेल्या आंब्याला फारच कमी सुगंध असतो. कधी कधी अजिबातच गंध नसतो. पण नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याला गोड गंध येतो.
कट टेस्ट करा
आंबा कापल्यानंतर जर त्याचा रंग गडत पिवळा असेल तर तो नैसर्गिकरित्या पिकलेला असतो. आंब्याच्या कडा गडद आणि त्याचा गर जर हलका पिवळा असेल तर तो केमिकल्सच्या मदतीनं पिकवलेला आहे, हे ओळखून जा.