…असे भेटणं म्हणजे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा डाव– Eknath Khadse चे टीकास्त्र
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : राज्यातील राजकीय घडामोडींवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपला चांगलेच सुनावले आहे. भाजपचा राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा डाव यशस्वी होणार नाही, असे म्हणत त्यांनी भाजपवर टिकास्त्र सोडले आहे. तसेच, त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे
राज्यात सत्ता नसल्यामुळे भाजपचे नेते अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे ते आदळ आपट करत आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नसल्याच्या बोंबा ते मारत आहेत. एक तर महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळेच भोंगे, हनुमान चालिसाचे मुद्दे काढून विरोधकांकडून लक्ष विचलित करण्याचे काम सुरू आहे. विरोधककांकडून राज्यात वारंवार अशांतता निर्माण करण्याचे काम सुरू आहे.
कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्या अशा बोंबा ठोकायच्या आणि राज्यपालांना भेटायचे हेच काम विरोधकांना उरलं आहे. विरोधक राज्यपालांना वारंवार भेटून एक षड्यंत्र सुरू आहे. पण राष्ट्रपती राजवट लावण्याचं हे षड्यंत्र यशस्वी होणार नाही, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.
महाविकास आघाडी सरकारची भूमिका गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या विषयी कठोर आहे. शासनाचे काम गुन्हेगारांना वचक बसवण्यासाठीचं आहे. अशा स्वरूपाची कृती शासनाकडून अपेक्षित असते. महाविकासआघाडी सरकार या दृष्टीने आता पाऊल उचलत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे, असं खडसे यांनी सांगितलं.