भोसरी एमआयडीसी भूखंड प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार !
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांची पुन्हा चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील बंड गार्डन येथे एकनाथ खडसे यांच्यावर एसीबीने गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणी एकनाथ खडसे यांची चौकशी झाल्यानंतर तपासी अधिकाऱ्यांनी क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला होता. मात्र, तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीत ज्या बाबींची चौकशी करण्याची मागणी केली होती, त्याचा तपास न झाल्याचा आक्षेप तक्रारदार यांनी केला आहे. एकूणच न्यायालयाने पुन्हा दिवाळीनंतर कागदपत्रे मिळताच तपास करण्याच्या सूचना केल्या आहेत. खडसे यांना चौकशीत जवळपास क्लीनचिट मिळेल अशी खात्री होती, मात्र नव्याने तपास केला जाणार असल्याने खडसेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी खडसे यांच्यासह त्यांच्या नातलगांची चौकशी करण्यात आली होती. पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात एसीबीकडून गुन्हा ही दाखल करण्यात आलेला होता, त्यानुसार विविध यंत्रणांकडून खंडसे यांची चौकशी सुरू होती. त्यानंतर न्यायालयात एकनाथ खडसे यांच्याबाबतचा क्लोजर रिपोर्ट देखील सादर करण्यात आला होता, मात्र त्यावर तक्रारदार यांनी आक्षेप घेत तक्रारीत नमूद केलेल्या बाबींचा तपास न झाल्याचे म्हंटले आहे. त्यावरून पुन्हा न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले असून दिवाळीनंतर ही चौकशी पुन्हा केली जाणार आहे.