महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे, अनैसर्गिक आघाडी सोडायलाच हवी– एकनाथ शिंदेंच ठाकरेंना उत्तर
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधल्यानंतर एकनाथ शिंदे त्यांना काय प्रतिक्रिया देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. दरम्यान, ते आज सायंकाळी सात वाजता पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार होते. मात्र, त्यांनी पत्रकार परिषद न घेता ट्विट करत घटक पक्षामुळे शिवसेनेला तोटा झाल्याचं म्हटलं आहे.
गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे – शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे, असं एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत म्हटल्याने शिंदे मोठा निर्णय घेण्याचा तयारीत असल्याचे संकेत दिल्याचे बोलले जात आहे.
त्यांनी चार मुद्यांद्वारे आपले म्हणणे मांडले आहे.
१. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला.
२. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे – शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे.
३. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.
४. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे.
हे चार मुद्दे पाहिले तर माघार घेण्याच्या मनःस्थितीत एकनाथ शिंदे नाहीत. त्यामुळे शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार हे आता शिवसेना नेतृत्वाला आव्हान देणार असल्याचे दिसून येत आहे.