शिंदे गटानं झिरवळांवरच डाव उलटवला; अविश्वास प्रस्तावामुळे अपात्रेचा अधिकार नाहीत, आमदारांचं पत्र
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : शिवसेनेने बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 12 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली आहे. त्यामुळे शिंदे गट अडचणीत आल्याची चर्चा होती. पण आता अपक्ष आमदार महेश बालदी आणि विनोद अग्रवाल हे शिंदे गटासाठी धावून आले आहेत. झिरवळ यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव यापूर्वीच दाखल केला असल्याने त्यांना आमदारांना अपात्र करता येणार नाही, असं पत्र दिलं आहे.
भारतीय राज्यघटनेतील कलम 179 आणि महाराष्ट्र विधानसभा नियम 11 नुसार विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना हटवण्याची नोटीस आधीच दिली आहे. शिवसेनेतील (Shiv Sena) काही आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी झिरवळ यांच्याकडे करण्यात आली आहे, असं म्हणून बालदी व अग्रवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाने अशा घटनांबाबत नोंदविलेले निरीक्षणे पत्रात नमूद केली आहेत.
एकनाथ शिंदेसह 12 आमदारांवर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधिमंडळ कायद्यांतर्गत झिरवळ कारवाई करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं. सुनील प्रभू यांनी काढलेल्या व्हीपनंतर बैठकीला उपस्थित नसल्याने या 12 आमदार कारवाई करण्याची विनंती सुनील प्रभू यांनी केली होती. मात्र, आता हा आकडा आणखी वाढला आहे. आता यात आणखी 5 आमदारांची भर पडली आहे. शिवसेनेकडून आणखी पाच जणांविरोधात अपात्रतेसाठी नावे देण्यात आली आहेत.
कारवाईच्या बातम्यांनंतर उपाध्यक्षांना तो अधिकारच नसल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. यासंदर्भात दोन अपक्ष आमदारांनी विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहलं आहे. महेश बालदी आणि विनोद अग्रवाल यांनी हे पत्र उपाध्यक्षांना दिलं आहे. एकनाथ शिंदे गटाने दोन दिवसांपूर्वीच अविश्वास प्रस्ताव विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या विरोधात दाखल केला आहे. विधानसभा नियम 179 अन्वये नरहरी झिरवळ यांना हटविण्यासंदर्भात यापूर्वीच पत्र दिले असल्याने आमदारांच्या अपात्रतेचे अधिकार नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
यासाठी 2016च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखल पत्रात दिला आहे. घटनेच्या दहाव्या परिशिष्टाप्रमाणे अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल असेल तर त्यावर निर्णय होईस्तोवर त्यांना आमदारांच्या अपात्रतेचे अधिकार राहत नाहीत. एकनाथ शिंदे गटाने दोन दिवसांपूर्वीच अविश्वास प्रस्ताव विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या विरोधात दाखल केला आहे. त्यामुळे हा निर्णय आता कोर्टात जाण्याची शक्यता आहे.