विनापरवाना शेतमाल खरेदी करणाऱ्या सावदा येथील व्यापाऱ्याला ठोठावला यावल कृषी उत्पन्न बाजार समितीने २१ हजार दंड
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क लनरावेर तालुक्यातील सावदा येथील एक व्यापारी यावल तालुक्यातील दहिगाव येथे विनापरवाना मका खरेदी करतांना मिळून आला त्या नंतर संबधीत व्यापारी व मक्याने भरलेले वाहन यावल कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आणून व्यापाऱ्याकडून यावल कृषी उत्पन्न बाजार समिती ने २१ हजार रुपये दंड वसुल केला.
शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असते हा दृष्टिकोन समोर ठेऊन यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडेसह संचालक मंडळ आणि येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कारवाईचे धोरण अवलंबले असून, जो कोणी विनापरवाना शेतकऱ्यांचा माल खरेदी करेल त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार, अशी जाहीर सूचना या आधीच बाजार समितीने गावोगावी रिक्षा फिरवून लाऊड स्पीकर मधून जाहीर केली आहे. तसेच गावातील वि का सोसायटी आणि ग्रामपंचायतमध्ये नोटीस चिटकवण्यात आली आहे. असे असताना यावल तालुक्यातील दहिगाव येथील चार ते पाच शेतकऱ्यांचा मका सावदा येथील व्यापारी शेख रईस शेख सलीम कुरेशी यांनी चढ्या भावाने खरेदी केला. हे उघड झाले.
सदर संबंधित शेतकऱ्यांची सभापती राकेश फेगडे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव स्वप्निल सोनवणे यांनी संपर्क साधून चौकशी केली. व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे पैसे दिले. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीची फी न देणे व विनापरवाना भुसार धान्य खरेदी करणे या कारणाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचाऱ्यांनी सदरची गाडी दहिगाव वरून कृषी उत्पन्न बाजार समिती यावल येथे आणून लावली.
तसेच,संबंधित व्यापाऱ्याला सावदा येथून बोलावून बाजार समितीचे सर्व नियम कसे आहेत हे सांगितल. त्यानुसार झालेली चूक लक्षात येताच व्यापारी रईस शेख सलीम कुरेशी यांच्याकडून २१ हजार रुपये दंड वसुल करण्यात आले आहे. मक्याने भरलेली ट्रक वाहन क्रमांक (एमएच ४६ एएफ ५५५४) हा संबंधित व्यापाऱ्याच्या ताब्यात दिली..
सदरच्या या दंडात्मक कारवाईमुळे तालुक्यात विनापरवाना अनधिकृतपणे शेतकरी बांधवांकडून शेतीमालाची खरेदी करणाऱ्या तथाकथित व्यापाऱ्यामध्ये भितीचे वातावरण पसरले असून विनापरवाना धान्य खरेदी केल्यास अशाच प्रकारे दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे यांनी सांगितले.