आंतराष्ट्रीय

“हिंदूंच्या सुरक्षेचे आश्वासन” पंतप्रधान नरेंद्र मोदींना आला फोन….

दिल्ली, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l शेख हसीना यांचे बांगलादेशातील सरकार उलथून टाकल्यानंतरही अजून हिंसाचार सुरूच आहे. देशात हिंदू अल्पसंख्याकांना उग्रपणे लक्ष्य केले जात आहे, ज्यावर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी बांगलादेशातील परिस्थितीचा उल्लेखही केला होता. आता बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला आहे. खुद्द पीएम मोदींनी ही माहिती दिली. दोन्ही नेत्यांनी बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीवर विचार विनिमय केला. भारताने लोकशाही, स्थिर, शांततापूर्ण आणि प्रगतीशील बांगलादेशासाठी भारताच्या समर्थनाचा पुनरुच्चार केला. मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशातील हिंदू आणि सर्व अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचे आश्वासन दिल्याचे पीएम मोदींनी सांगितले.

बांगला देशातील शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडल्यानंतर, ८ ऑगस्ट रोजी मोहम्मद युनूस यांनी अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून शपथ घेतली. युनूस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मोदींनी त्यांचे अभिनंदन केले आणि बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदी यांनी हिंसाचारग्रस्त बांगलादेशातील परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल अशी आशा व्यक्त केली होती. शेजारील देशातील हिंदू आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत १४० कोटी भारतीय चिंतेत असल्याचे ते म्हणाले होते. त्यानंतर आता युनूस यांनी सध्याच्या परिस्थितीबाबत पीएम मोदींशी चर्चा केली.

सत्तापालट झाल्यानंतर बांगला देशात अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले आहे. परंतु शेजारील देशातील अल्पसंख्याकांच्या आणि विशेषतः हिंदूंच्या सुरक्षेबाबत अजूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारतातही याबाबत सातत्याने चिंता व्यक्त केली जात असून केंद्र सरकारने हिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दा अनेकदा उपस्थित केला आहे. दरम्यान, बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून हिंदूंच्या सुरक्षेचे आश्वासन दिले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!