जळगाव जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ लीपिकला लाच घेताना रंगेहाथ अटक
जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l शिपाई पदावरून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर बदली झाल्यानंतर तक्रारदाराला बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ लिपिकाने २ लाखांची लाच मागितली. तडजोडीअंती १ लाख ८० हजार रुपये लाच घेताना या लाचखोर लिपिकाला बुधवार दि. २१ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संध्याकाळी अटक केली आहे. या कारवाईने जिल्हा परिषदेत मोठी खळबळ उडाली.
तक्रारदार हे २६ वर्षीय पुरुष असून ते जळगावात राहतात. तक्रारदार हे लोकसेवक असून तक्रारदार यांची सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्र, यावल येथे शिपाई पदावर नोकरी होती. तेथे ते कार्यरत होते. नंतर त्यांची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर रावेर पंचायत समिती येथे बदली झाली होती. बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी वरिष्ठ लिपिक नरेंद्र किशोर खाचणे (वय ५२) यांनी २ लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदारांनी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागकडे दिनांक २१ ऑगस्ट रोजी तक्रार केली होती.
तक्रारीनुसार बुधवार दि. २१ ऑगस्ट रोजीच संध्याकाळी पडताळणी केली असता वरिष्ठ लिपिक नरेंद्र किशोर खाचणे वय ५२ वर्ष, व्यवसाय नोकरी , वरिष्ठ लिपीक नेमणूक सामान्य प्रशासन विभाग जळगाव ( वर्ग ३ ) यांनी पंचासमक्ष तडजोडी अंती १ लाख ८० हजार रुपयाची लाचेची मागणी करून स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहात अटक करण्यात आले आहे. त्यांच्यावर शनीपेठ पोलीस स्टेशन, जळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जिल्हा परिषदेत या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
पर्यवेक्षक अधिकारी पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पो.नि.एन.एन.जाधव, पीएसआय दिनेशसिंग पाटील, पो.हे.कॉ. सुरेश पाटील,पो.हे.कॉ.रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ.शैला धनगर, पो.ना.बाळू मराठे,पो.कॉ.प्रणेश ठाकूर, पोना.किशोर महाजन,पो.ना. सुनिल वानखेडे,पो.कॉ.प्रदीप पोळ, पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी,पो.कॉ. सचिन चाटे यांनी कारवाई केली.