भरधाव अज्ञात वाहनाची जोरदार धडक, वृद्धाचा मृत्यू
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने पायी जाणाऱ्या भीमराव इंगळे वय-७४, रा. दर्यापूर शिवार, वरणगाव ता.भुसावळ यांचा मृत्यू झाल्याची घटना भुसावळ शहरातील दर्यापूर शिवारातील राष्ट्रीय महामार्गावर १० जानेवारी शुक्रवार रोजी रात्री ८ वाजता घडली.
मिळालेली माहिती अशी की, भीमराव इंगळे हे वृद्ध शुक्रवारी १० जानेवारी रोजी रात्री ८ वाजता भुसावळ तालुक्यातील दर्यापूर शिवारातील राष्ट्रीय महामार्गावर पायी जात होते. त्यावेळी ते रस्ता ओलांडत असताना त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत भीमराव इंगळे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेबाबत शनिवारी ११ जानेवारी सायंकाळी ५ वाजता वरणगाव पोलीस स्टेशनला अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.