जिल्ह्यातील ५७५ सहकारी संस्थांच्या निवडणुका
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रखडलेल्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका ह्या दि. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पूढे ढकलण्यात आल्या होत्या. दरम्यान शासनाकडून पुढील आदेश प्राप्त नसल्याने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दि. ६ जानेवारीपासून ज्या टप्प्यावर निवडणूका स्थगित केल्या होत्या. तेथून प्रक्रियेस सुरूवात करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील रखडलेल्या ५७५ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली.
राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका घेण्याची जबाबदारी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणावर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार निवडणूक प्राधिकरणाने वेळोवेळी निवडणुकांची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र कोरोना काळ, त्यानंतर काही प्रशासकीय कारणास्तव राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ह्या दि. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्याचे आदेश दिले होते. स्थगितीच्या आदेशाची ही मुदत आता संपुष्टात आली आहे. तसेच पुढील कुठलेही आदेश निर्गमित न झाल्याने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दि. ६ जानेवारीपासून सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया आहे त्या टप्प्यापासून सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
यात अ, ब, क आणि ड वर्गातील सहकारी संस्थांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. आता दि. ६ जानेवारीपासून सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरूवात होणार असून यात जळगाव जिल्ह्यातील ब वर्गातील – ५०, क वर्गातील- ४०० आणि ड वर्गातील १२५ अशा एकूण ५७५ संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. ब वर्गात- विका संस्था, पगारदार संस्था, पतसंस्था, क वर्गात – नागरी व पिक संरक्षण, ग्राहक संस्था आणि ड वर्गात- इतर सर्व सहकारी संस्था यांचा समावेश आहे.