भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलल्या, काय आहे कारण?

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पावसाळ्याच्या हंगामामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहे. जवळपास ८३०५ सहकारी संस्थांची निवडणूक आता पुढे ढकलण्यात आली आहे.

राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ७३ कब मधील तरतुदीनुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत राबविण्यात येते. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या कार्यालयाकडून १२ जूनला पत्राव्दारे शासनास प्राप्त झालेल्या अहवालानुसार २०२४ -२५ या वर्षात राज्यातील २४,७१० सहकारी संस्थांची निवडणूक प्रलंबित असल्याची माहिती समोर आली. यापैकी ८३०५ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. पण पावसामुळे या सर्व सहकारी संस्थांची निवडणूक ही ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पावसाचा आणि शेतकऱ्यांचा विचार करुन राज्य शासनाकडून याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सरकारनं आदेशात?
हवामान विभागाने २०२४ मध्ये सर्वसाधारण पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मदत व पुनर्वसन विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, राज्यातील १४ जिल्ह्यात मागील वर्षाच्या सरासरीच्या १०० टक्के पेक्षा जास्त आणि ५ जिल्ह्यात सरासरीच्या ७० टक्के पेक्षा जास्त पाऊस झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बहुतेक जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामातील पेरणी, पीक लागवड आणि इतर अनुषंगिक शेतीविषयक कामात व्यस्त आहे. अशा शेतकऱ्यांना ते सभासद असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. ही बाब विचारात घेऊन राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया पावसाचा हंगाम पूर्ण होईपर्यंत (३० सप्टेंबर, २०२४) पुढे ढकलणे उचित होईल अशी शासनाची धारणा आहे, असं राज्य सरकारने आदेशात म्हटलं आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ७३कक मधील तरतुदीनुसार पावसाळ्याच्या हंगामात सहकारी संस्थांची निवडणूक पुढे ढकलण्याचा शासनास अधिकार आहे. त्याअर्थी सदर आदेशाच्या उपरोक्त परिच्छेदात नमूद केल्याप्रमाणे राज्यातील अनेक जिल्ह्यातील पावसाची सद्यस्थिती विचारात घेऊन राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच सर्वोच्च/उच्च न्यायालयाने सहकारी संस्थेची निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. अशा सहकारी संस्था तसेच निमडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केवळ संस्थेचे अध्यक्ष/उपाध्यक्ष निवड बाकी आहे, अशा सहकारी संस्था वगळून अन्य सहकारी संस्थांची निवडणूक या आदेशाच्या दिनांकापासून सध्या ज्या टप्प्यावर आहे, त्या टप्प्यावर ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे, असं राज्य शासनाने जाहीर केलं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!