रावेर, यावल व फैजपूर येथे बचत गटातील महिलांसाठी सक्षमीकरण केंद्र स्थापन करावे – आ. अमोल जावळे
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांनी मतदारसंघातील महिला सक्षमीकरण, आरोग्य व्यवस्था,बालसंवर्धन आणि आनंदी जीवनशैली यासंबंधी महत्त्वाचे प्रश्न मांडले. त्यांनी विधानसभेत जोरदार मागणी करत सांगितले की, रावेर तालुक्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागात आरोग्य सेवांचा मोठ्या प्रमाणावर अभाव आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
रावेर, यावल आणि फैजपूर येथे बचत गटातील तसेच इतर सर्व महिलांसाठी स्वतंत्र सक्षमीकरण केंद्रे स्थापन करण्यात यावीत, अशी महत्त्वपूर्ण मागणी त्यांनी विधानसभेत मांडली. या केंद्रांमध्ये महिलांना विविध प्रकारच्या कौशल्यविकास प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन, उद्योजकता विकास कार्यक्रम, आत्मनिर्भरतेसाठी मार्गदर्शन तसेच सरकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या योजनांची सविस्तर माहिती मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विशेषतः बचत गटातील महिलांना आधुनिक काळाच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण, प्रेरणादायी सत्रे आणि सामूहिक चर्चासत्रांद्वारे सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी आवश्यक साधनसामग्री आणि सुविधा पुरवण्यात याव्यात, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
महिला सक्षमीकरण हा केवळ व्यक्तिगत विकासाचा मुद्दा नसून, संपूर्ण समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवाव्यात, असे त्यांनी ठामपणे अधोरेखित केले.
रावेर तालुक्याला लागून मोठा आदिवासी पट्टा असून हे शहर मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राला जोडणारे महत्त्वाचे ठिकाण आहे. प्रत्येक वर्षी अंदाजे ६९,००० रुग्ण उपचारासाठी येतात, मात्र उपलब्ध आरोग्य सुविधा अत्यंत मर्यादित आहेत. सध्या येथे केवळ ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय कार्यरत असून, वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत हे अपुरे ठरत आहे. त्यामुळे या रुग्णालयाला जिल्हा उपरुग्णालयाचा दर्जा देऊन त्याचा विस्तार करण्याची तातडीची गरज आहे, अशी ठाम मागणी आमदार अमोल जावळे यांनी विधानसभेत मांडली. आदिवासी व ग्रामीण भागातील नागरिकांना सर्वोत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी शासनाने तातडीने कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रसलपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम चार वर्षांपूर्वी पूर्ण झाले आहे. मात्र, अद्याप त्यामध्ये इलेक्ट्रिक फिटिंगचे काम पूर्ण न झाल्याने हे आरोग्य केंद्र सुरूच होऊ शकलेले नाही. परिणामी, स्थानिक रुग्णांना इतर ठिकाणी जावे लागत आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आरोग्य केंद्राच्या उभारणीसाठी मोठा निधी खर्च झाला असला तरी, त्याचा प्रत्यक्ष उपयोग नागरिकांना होत नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे त्यांनी अधिवेशनात सांगितले.
शासन मोठ्या प्रमाणावर नवीन आरोग्य केंद्रे आणि रुग्णालयांसाठी निधी मंजूर करत असते. मात्र, त्यांच्या देखभालीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. आमदार जावळे यांनी यासंदर्भात अचानक भेटी देऊन पाहणी केली असता, अनेक ठिकाणी रुग्णालयात अस्वच्छता, मूलभूत सुविधा नसणे आणि कर्मचार्यांची अनुपस्थिती यासारख्या गंभीर बाबी निदर्शनास आल्या. त्यामुळे, या समस्यांकडे गांभीर्याने पाहण्यासाठी प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक सक्षम मॉनिटरिंग यंत्रणा कार्यान्वित करावी, अशीही त्यांनी मागणी केली.
जळगाव जिल्ह्यात बालसंवर्धनाच्या अनेक प्रकरणांचा निकाल प्रलंबित आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांकडे स्पष्ट आणि अधिकृत आकडेवारी देखील उपलब्ध नाही, ही बाब गंभीर असून प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावी आणि जे अधिकारी या प्रकरणात दिरंगाई करत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असेही त्यांनी विधानसभेत सांगितले.
ग्रॉस हॅपिनेस इंडेक्स संकल्पनेची नाविन्यपूर्ण मागणी
भूतानमध्ये ‘ग्रॉस हॅपिनेस इंडेक्स’ ही संकल्पना यशस्वीपणे राबवली जाते, ज्यामुळे नागरिकांचे मानसिक आरोग्य आणि जीवनातील समाधान वृद्धिंगत होते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही ‘हॅप्पीनेस लर्निंग’ संकल्पना व्यापक प्रमाणात प्रोत्साहित करावी, अशी मागणी आमदार अमोल जावळे यांनी केली. या उपक्रमाद्वारे मानसिक सशक्तीकरण, सकारात्मक दृष्टिकोनाचा विकास आणि आनंदी जीवनशैलीचा प्रचार केला जाऊ शकतो. हे शिक्षण विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनाही तणावमुक्त, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्यासाठी प्रेरित करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रावेर मतदारसंघातील या गंभीर समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा आणि आवश्यक उपाययोजना अमलात आणाव्यात, अशी जोरदार मागणी आमोल जावळे यांनी केली आहे .
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा