संघटनात्मक निवडी जाहीर होण्याआधीच, निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या वेदना कधी ओळखणार ? ….तर पक्ष आणि नेत्याचं भवितव्य संकटात येईल ! आशयाची पेपर कटिंग कार्यकर्त्यांकडून तुफान केली जातेय शेयर
रावेर, मंडे टू मंडे न्युज चमू | राज्यभरात भाजपच्या मंडळ व शहराध्यक्ष पदाच्या नियुक्या आज २० एप्रिल रोजी जाहीर होण्या आधीच सोशल मीडिया फेसबुक व व्हॉट्सऍप वरती निष्ठावंत कार्यकर्त्यांची वेदना कधी ओळखली जाणार ? अश्या आशयाची पेपर कटिंग बातमी कार्यकर्त्यांकडून तुफान शेयर करत एक नाराजीचा सूर असल्याचे दिसून येत आहे. आता नेतेच निष्ठावंत राहिले नाहीत मग वेदना कोणाला कळतील अश्या संतप्त वेगवेगळ्या मत कार्यकर्ते सोशल मीडियात मांडत आहेत.
राजकारणात आपल्या पक्षाचा रुबाब वाढण्यासाठी व सर्व सत्तास्थाने आपल्या पक्षाच्या ताब्यात येण्यासाठी निष्ठावान कार्यकर्ते रक्ताचे पाणी करुन गावात कष्ट घेतात . असे असताना ‘मेहनत करे मुर्गी ओर अंडा खायें’ फकीर ? या युक्तीमुळे चमचे चमकोगिरी करताना दिसत आहे. यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांच्या फुनग्या लावून वरचढ होत असल्याचे निष्ठावान कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहेत. निवडणूक निकाल लागला नंतर प्रत्येक गावात चमकोगिरी करणारे २/४ कार्यकर्ते म्हणजे सर्व पक्ष संघटना असे लोकप्रतिनिधी समजतात जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांना कोणी विचारत नाही.
त्यामुळे “धन्याला धतुरा अन् चोरांना मलिदा” मिळत असल्यामुळे आपल्या पक्षासाठी युती धर्मासाठी मेहनत घेवूनही त्याचे फळ ‘चमचे’ अगलद उचलत आहे. चमकोगिरी करणाऱ्या कार्यकर्त्याना किमत दिली जाते असे आरोप सोशल मीडियावर महायुतीच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केले जात आहे. त्यात “तेरी भी चूप और मेरी भी चुप “ म्हणत नेते व लोकप्रतिनिधी ही याकडे दुर्लक्ष करतात अश्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आहे. ते आपल्या नेत्यांना सांगून निष्ठावान कार्यकर्त्यांना बाजूला सारत असल्याने या पितळाचे कान असणाऱ्या नेत्यांना निष्ठावान कार्यकर्त्यांचा करिष्मा कधी समजणार ? असा सवालही निष्ठावान कार्यकर्त्यांतून सोशल मीडियात उपस्थित केला जात आहे.
सदर कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियात शेयर करण्यात येत असलेल्या मजकुरात म्हटले आहे की, गावागावातल्या कार्यकर्त्याशिवाय पक्षाची ताकद उभी राहूच शकत नाही. हे कार्यकर्ते पक्षासाठी घरदार, संसार, कुटुंब, सगळं विसरून जीवाचं रान करतात. हेच कार्यकर्ते प्रचाराच्या काळात रस्त्यांवर फिरून, लोकांच्या दारात जाऊन पक्षाचं काम उभं करतात. निवडणुकी काळात घरून भाकरी खाऊन विरोधकांशी पंगा घेत निष्ठेने प्रचार करतात.
पण निवडणुकीचा निकाल लागला की मात्र या निष्ठावंत कार्यकर्त्यांचं नावसुद्धा काढलं जात नाही. कोणीतरी चमकोगिरी करणारे, नेत्यांच्या पायाशी बसून लुडबुड करणारे लोकच पुढे येतात. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी सोबत फोटोशन करून ते फोटो फेसबुक, व्हॉटअप वर शेअर करतात, वास्तविक त्यांचे समाजकार्य शून्य असतं. आयत्यापीठावर रेघोट्या ओढणारे हे रेडीमेड पुढारी बनतात. लोकप्रतिनिधी बरोबर फोटो काढला म्हणजे चमकोगिरी करणाऱ्यांना असे वाटते आपण आता झाले मोठे. हा निष्ठावंत कार्यकर्त्यांवरील मोठा अन्याय आहे. निष्ठावात कार्यकर्ता कधीही फोटो काढून प्रसिद्धीच्या मागे लागत नसतो.
पक्षासाठी ज्या कार्यकर्त्यांनी जीव तोडून काम केलं, त्यांना बाजूला ठेवून फक्त लाळघोटेच अचानक पुढे आलेले सगळीकडे दिसतात. गावागावात निष्ठेने काम करणाऱ्या परंतु स्वाभिमानी असलेल्या लोकांना कुणी विचारतच नाही. एखाद्या कार्यकर्त्यानि प्रचारासाठी जीवाचे रान केले, विरोधकांचा सामना केला, लोकांच्या मनात पक्षाचं, नेत्याचं नाव बसवलं, तरी त्याला सन्मानाची वागणूक मिळत नाही. उलट, नेत्यांच्या भोवती वावरणारे स्वार्थी लोकच पुढे येतात, आणि त्यांनाच नेत्याकडून किंमत दिली जाते. हे भयानक वास्तव पाहायला मिळत आहे. नेत्याच्या भोवती असे चित्र दिसत असेल तर निष्ठावंत कार्यकर्त्याच्या मनात किती दुःख होत असेल, याचा विचारही कुणी करत नाही. जो कार्यकर्ता मनातून प्रामाणिक आहे, त्याला नेत्यांनी बोलवून दोन शब्द सांगितले तरी त्याला समाधान वाटेल. पण असं होतच नाही. निव्वळ चमकोगिरी करणारे लोकच नेत्याजवळ लुडबुड करताना दिसतात. याचं समाजकार्य काय? नेत्यांनी या गोष्टी वेळेत ओळखायला हव्यात. गावात, तालुक्यात काम करणाऱ्या निष्ठावंत लोकांना जवळ घेतलं पाहिजे. पक्ष, नेतृत्व टिकवायचे असेल, तर या चमकोगिरी आणि लुडबुड करणाऱ्या लोकांना बाजूला केलं पाहिजे. ज्या माणसांनी पक्ष वाढवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट केले त्यांचा सन्मान झाला तरच पक्ष आणि नेता मोठा होईल. नाहीतर निष्ठावंत कार्यकर्त्यांची
ताकद हरवेल आणि पक्ष आणि नेत्याचं भवितव्य संकटात येईल, हे मात्र नक्की !