पोलीस आयुक्तालयाच्या आवारात दारूच्या बाटल्या सापडल्याने खळबळ
पुणे, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l नुकतेच पुण्यातील कल्याणी नगर परिसरात एका धनिकपुत्राने आलिशान पोर्शे कारने दोन तरुणांना उडवले यामध्ये त्या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याने घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर पुणे पोलिसांवर संताप व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकार ताजा असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आवारात दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे पोलीस ऑन ड्युटी ड्रिंक करुन काम करतात की काय? असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. या गंभीर प्रकारावर पोलीस आयुक्त ( CP)अमितेश कुमार काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
आयुक्तालयात कडक सुरक्षा व्यवस्था
पोलीस आयुक्तालयाच्या आवारात दारुच्या बाटल्या सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातच पोलीस पार्टी करतात की काय?. मात्र, ही पार्टी नेमकं कोण करतं असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तसेच आयुक्तालयात येणाऱ्या प्रत्येकाची गेटवर त्यांची संपूर्ण चौकशी केली जाते. त्याची चेकींग आणि रजिस्टरमध्ये नोंद केली जाते. त्यांचे नाव, ओळखपत्र, काय काम आहे, कोणाला भेटायचे आहे, अशी सर्व चौकशी करुन नागरिकांना आत सोडले जाते. सहजासहजी सामान्य नागरिकांना आयुक्तालयात येणं शक्य नाही. एवढी कडक सुरक्षा असताना आयुक्तालयात दारुच्या बाटल्या आल्या कशा आणि कोणी आणल्या? कोण कोणत्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी आयुक्तालयात पार्टी केली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या गंभीर प्रकाराची दखल वरिष्ठ घेऊन संबंधितांवर कारवाई करणार की, नुसती चौकशी करणार असल्याचे सांगून हा प्रकार दाबणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आवारात दारूच्या रिकाम्या बाटल्या पडल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. पोलीस आयुक्तलयाच्या आवारात गुन्हे शाखेची इमारत आहे. याच इमारतीच्या काही अंतरावर आणि पाठीमागे मोठ्या प्रमाणात रिकाम्या दारुच्या बाटल्या सापडल्या आहेत. एवढी सुरक्षा घेतली जात असताना पोलीस आयुक्तालयात दारुच्या बाटल्या आणल्या कोणी? एकीकडे पुण्यात ड्रँक अँड ड्राईव्हचा प्रकार घडला असताना आयुक्तालयात ऑन ड्युटी ड्रिंक असा काही प्रकार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, आज बुधवार रोजी पोलीस आयुक्तालयाच्या आवारात रिकाम्या दारुच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्याचे व्हिडीओतून समोर आले आहे. त्यामुळे पुणे पोलिस आयुक्तालयात चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आयुक्तालयातील हा प्रकार अत्यंत गंभीर असून पोलीस आयुक्त अमितेश कुमार या प्रकरणाची कशी दखल घेतात आणि काय कारवाई करणार हे पाहावं लागेल.