पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत कांग्रेस आमदाराची हकालपट्टी
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत अमरामती विधानसभेच्या आमदार सुलभा खोडके यांच्यावर काँग्रेस पक्षाने मोठी कारवाई केली आहे. सुलभा खोडके यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या निर्देशावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही कारवाई केली आहे.
काही महिन्याआधी पार पडलेल्या राज्यसभा, त्यानंतर विधान परिषद निवडणुकीत काही काँग्रेस आमदारांनी ‘क्रॉस व्होटिंग’ करत विरोधकांना मदत केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यामध्ये सुलभा खोडके यांचे देखील नाव होते. काँग्रेसच्या ज्या पाच आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप होता, त्यांना आगामी विधानसभेची उमेदवारी देण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले होते. यामध्ये सुलभा खोडके यांचंही नाव होत.
मागील काही काळापासून सुलभा खोडके राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. त्यातच नुकतीच त्यांनी अमरावतीमध्ये जोरदार बॅनरबाजीही केली होती. त्यानंतर आता सुलभा खोडके यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे.
सुलभा खोडके उद्या रविवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी अमरावती दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत उद्याच खोडके यांचा प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे, त्याआधीच काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. दरम्यान खोडके अमरावतीमधून अजित पवार गटातून विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.