फैजपूर विभागाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षिका अन्नपूर्णा सिंह यांची पदोन्नतीवर बदली
फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l गेल्या १४ महिन्यांपासून फैजपूर येथे कार्यरत असलेल्या फैजपूर विभागाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षिका अन्नपूर्णा सिंह यांची छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून पदोन्नतीवर बदली करण्यात आली आहे.शासनाच्या गृह विभागाने या बाबतचे आदेश शुक्रवारी उशिरा काढले. आयपीएस अधिकारी असलेल्या अन्नपुर्णा सिंह या शिस्तीचा अवलंब करणा-या अधिकारी म्हणून ओळखल्या जातात.
सन २०२० च्या त्रिपुरा बॅचच्या आयपीएस अधिकारी अन्नपुर्णा सिंह यांची फैजपूर पोलिस उप विभागात सहायक पोलिस अधिक्षक तथा डीवायएसपीपदी नियुक्ती झाली होती. महाराष्ट्र २०१९ च्या आयएएस बॅचचे अंकित (सीईओ जिल्हा परिषद, जळगाव.) यांच्यासोबत अन्नपुर्णा सिंह यांचा विवाह झाला असून त्यामुळे भारतीय पोलिस सेवा (कॅडर) नियम १९५४ चा नियम ५ च्या उप नियम (२) नुसार त्रिपुरा आणि महाराष्ट्र सरकारच्या सहमतीने अन्नपुर्णा सिंह यांना त्रिपुरा संवर्गातून महाराष्ट्र संवर्गात स्थानांतरीत करण्यात आले आहे.
आयपीएस अधिकारी अन्नपूर्णा सिंह यांची फैजपूर येथे २२ डिसेंबर २०२३ रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षिका म्हणून बदली करण्यात आली होती. गेल्या १४ महिन्यापासून त्या फैजपूर येथे डीवायएसपी पदाचा कार्यभार सांभाळत होत्या. आता राज्य शासनाच्या गृह विभागाने शुक्रवारी दि. २८ फेब्रुवारी रोजी व्यंकटेश भट, उपसचिव यांच्या सहीने काही सहाय्यक पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यात अन्नपूर्णा सिंह यांना छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) ग्रामीण येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून पदोन्नतीवर नियुक्ती देण्यात आली आहे.

या पूर्वी अन्नपूर्णा सिंह यांच्या दि.१५ डिसेंबर २०२३ रोजी
चोपडा उप विभागासाठी डी वाय एस पी पदासाठी नियुक्तीचे आदेश देण्यात आले होते. आदेशा नुसार त्या १८ डिसेंबर २०२३ रोजी हजर देखील झाल्या होत्या. परंतु लागलीच पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने २२ डिसेंबर २०२३ रोजी जारी केले होते. त्यात त्यांना फैजपूर विभाग देण्यात आला. तेव्हा पासून त्या फैजपूर येथे डी वाय एस पी पदाचा कार्यभार सांभाळत आहे.