सैन्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखऊन १ लाख रूपयांत फसवणूक
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
हिंगोणा ता. यावल,मंडे टू मंडे वृत्तसेवा। मुलाला सैन्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत यावल तालुक्यातील हिंगोणा येथील एका शेतकऱ्याची १ लाख रूपयांत फसवणूक केल्याची घटना समोर आली .
या बाबत मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील हिंगोणा येथील शेतकरी शांताराम मांगो तायडे ,वय वर्षे-५२, याना त्याचा मुलगा गौरव याला सैन्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत संशयित आरोपी केतन मधुकर पाटील, मधुकर पाटील, शोभाबाई मधूकर पाटील सर्व रा. न्हावी ता. यावल जि.जळगाव यांनी ३ लाख रूपयांची मागणी केली होती. त्या नुसार शेतकरी शांताराम तायडे यांच्याकडून ३० मे २०२० रोजी १ लाख रूपये आडव्हॉन्स व सोबत मुलगा गौरवचे १२ वी पास झाल्याचे कागदपत्र आणि फोटो घेतले होते.
परन्तु दरम्यान तगादा लावून सुद्धा आजपर्यंत कोणतेही काम न झाल्याने शेतकरी शांताराम तायडे यांनी पैश्यांची मागणी केली असता संशयित आरोपी यांनी पैसे देण्यास टाळाटाळ करत शिवीगाळ करून, ‘तुमच्याकडे काय लेखी पुराव आहे का, तुम्ही कोठेही जा, काहीही होणार नाही असे बोलून जातीवाचक शिवीगाळ आणि जीवेठार मारण्याची धमकी दिल्याने शांताराम तायडे यांनी फैजपूर पोलीस स्टेशनला संशयित आरोपी केतन मधुकर पाटील, मधुकर पाटील, शोभाबाई मधूकर पाटील सर्व रा. न्हावी ता. यावल जि.जळगाव यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.