बनावट मद्याच्या कारखान्यावर धाड, बनावट दारुसह गांजाचा कोट्यावधींचा साठा जप्त
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l बनावट मद्याच्या कारखान्यावर धाड टाकत एलसीबीच्या पथकाने मोठी कारवाई केली. या कारवाईत बनावट दारुसह गांजाचा मोठा साठा पोलिसांनी हस्तगत केला असून या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.ही घटना धुळे शहरातील वाडीभोकर परिसरात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बनावट मद्याचा कारखाना धुळे शहरालगत असलेल्या वाडीभोकर परिसरात नाल्या किनारी एका घरात सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले.असता पथकाने तत्काळ मद्याच्या कारखान्यावर छापा टाकला.
यावेळी तेथे मद्य बनविण्यासाठी आवश्यक असलेले सुमारे २०० लिटर स्पिरीटचा साठा पोलिसांच्या हाती लागला. शिवाय बनावट मद्याचे सात खोके ही आढळले. यासह पोलिसांनी या ठिकाणची झाडाझडती घेतली असता जवळपास १५० गोण्या भरून गांजा पोलिसांच्या हाती लागला. जप्त केलेल्या या ऐवजाची किंमत अंदाजे कोट्यावधीच्या घरात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी दिली.