यावल तालुक्यातील शेतकरी बिबट्याच्या कचाट्यातून बालबाल बचावला, बोकडाचा मात्र फडशा
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |सध्या गाव वस्ती कडे बिबट्याचा संचार वाढला आहे. यावल तालुक्यातच गेल्या काही दिवसांपूर्वी लहान बालकाला उचलून नेले. काहींवर हल्लाकेल्याच्या घटना घडल्या . तसेच रावेर तालुक्यातील कुसुंबा शेत शिवारात ही पिल्लासह बिबट्या दिसून आला असताना आता यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील मोहाळी शिवारातील एका शेतात शेतकऱ्याला थेट त्याच्या समोर पुढ्यात मादी व तिचे पिलू अशा दोन बिबटे समोरच येऊन पडल्याने हल्ला करण्याच्या तयारीत असताना मोठ्याने आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला. आणि शेतकरी बिबट्याच्या कचाट्यातून बालबाल बचावला. या घटनेने परिसरात घबराट निर्माण झाली आहे. ही घटना दि.२४ एप्रिल गुरुवार रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमाराला घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील मोहाळी शिवारात शेतकरी मनोहर बळीराम पाटील यांच्या शेतात सदर शेतकरी नेहमीप्रमाणे आपल्या केळीच्या बागेला पाणीव भरत असतांना त्यांना कोणत्यातरी प्राण्याने एका बोकडाला आताच खाल्ले असल्याचे त्या बिबट्याच्या तोंडाला लागलेल्या रक्तावरून लक्षात आले. पुढ्यात समोरच बिबट्या आल्याने मनोहर पाटील घाबरलेल्या अवस्थेमध्ये हळूहळू मागे सरकत असतांना लागलीच त्यांच्या पुढ्यात एक बिबट्याचे लहान पिल्लू त्यांच्या पायावर पडले. त्यांच्या पायावर बिबट्याचा पाय पडल्यामुळे ते खाली पडले व मोठमोठ्याने आरडाओरड करू लागले. त्याचवेळी त्यांच्यापुढे आणखी दुसरा मादी बिबट्या येऊन उभा राहिला. त्या मादी बिबट्याच्या तोंडाला रक्त लागलेलं होतं. हा बिबट्या आता आपला जीव नक्की घेईल या धारणेतून गर्भगळीत झालेले मनोहर पाटील यांनी मोठमोठ्याने जीवांच्या आकांक्षेने आरडाओरड करीत खाली पडलेल्या अवस्थेत त्या बिबट्यांच्या दिशेने केवळ जमिनीवरील माती फेकत राहिले.
देव तरी त्याला कोण मारी…या म्हणी प्रमाणे त्यांचे दैव बलत्तर म्हणून त्यांच्या ओरडण्याने त्यांची पत्नी व परिसरातील शेतकरी वेळीच आरोळ्या मारत धावून आल्याने सदरील दोन्ही लहान-मोठे बिबटे हे जंगलात पळून गेले. यामुळे मनोहर पाटील यांचा जीव वाचला. ते या घटनेतून सुखरूप बाहेर आले. मात्र ही घटना गावात व परिसरात माहिती होताच या घटनेने परिसरात कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान घडलेल्या घटनेबाबत वन विभागाच्या वतीने पिंजरा ठेऊन तसेच कॅमेरे लावून संबंधित बिबट्यांवर निगराणी ठेवली जात आहे अशी माहिती पूर्व विभाग विभागाकडून देण्यात आली असून बिबट्यांनी पडशा पडलेला बोकड हा डोंगरदा येथील मेंढपाळ ठाकूर पावरा यांचा असल्याची माहिती शेतकऱ्यांकडून सांगण्यात आली. वनविभागाने बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.