राष्ट्रीय महामार्ग 753L प्रकरणी शेतकऱ्यांचा संताप ; मुक्ताईनगर तालुक्यात रास्ता रोको आंदोलन
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज.अक्षय काठोके | राष्ट्रीय महामार्ग 753L च्या बांधकामादरम्यान शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज तीव्र संताप व्यक्त करत रास्ता रोको आंदोलन केले. शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, महामार्गाच्या बांधकामासाठी अनेक ठिकाणी शेतजमिनींचा कोणताही मोबदला न देता जबरदस्तीने ताबा घेतला जात आहे. तसेच काही ठिकाणी अधिकची जमीन अतिक्रमण करून घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. जमीन मोजणीची शीट, आकार फोडणी तसेच आवश्यक कागदपत्रे शेतकऱ्यांना देण्यात आलेली नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
याशिवाय, महामार्गाचे अलाइनमेंट चुकीच्या पद्धतीने करण्यात आले असून काही ठिकाणी सुमारे वीस फूट उंचीचा रस्ता बांधण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात जाणेही कठीण झाले असल्याची तक्रार आंदोलनकर्त्यांनी केली.
या संदर्भात शेतकरी संघर्ष समितीने सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्र राज्याच्या महाधिवक्त्यांकडे (AG) अहवाल पाठविला होता. मात्र अद्याप कोणतेही ठोस उत्तर किंवा कार्यवाही झालेली नसल्याने शेतकऱ्यांचा रोष अधिकच वाढला आहे.
दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा, चुकीचे अलाइनमेंट दुरुस्त करावे आणि अन्यायकारक पद्धतीने घेतलेली जमीन परत करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. अन्यथा येत्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.


