पावसामुळे पिकांचे नुकसान : हताश झालेल्या शेतकऱ्याची नदीत उडी घेत आत्महत्या
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे वृत्तसेवा : शनिवारी रात्रीपासून पुन्हा पावसाने तडाखा दिल्याने उरलासुरला खरीप हंगामही पाण्यात गेला आहे. पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हे पाहून हताश झालेल्या एका शेतकऱ्याने पूर्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड येथे रविवारी सायंकाळी उघडकीस आली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, विनोद पाटील (वय-४०, रा. सातोड ता. मुक्ताईनगर) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.मुक्ताईनगर तालुक्यात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. विनोद हे रविवारी दुपारी पिकांची पाहणी करण्यासाठी शेतात गेले होते. पिकांचे नुकसान पाहून त्यांचा धीर सुटला. यानंतर ते घरी परतले आणि काही वेळाने खामखेडा येथील पुलावरून त्यांनी पूर्णा नदीत उडी घेत आत्महत्या केली.