चिनावल येथील शेतकरी आक्रमक, सुकी नदीत अवैध उत्खनन
सावदा/ चिनावल, ता. रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर तालुक्यातील सुकी नदी पात्रात गेल्या कित्येक दिवसांपासून अवैध वाळू उपसा होत असून चिनावल व परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीखाली भुयार तयार करून अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरु आहे. यामुळे शेती धोक्यात असल्याने चिनावल येथिल संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी आक्रमक पवित्रा घेतला. या बाबत अनेकदा शेतकऱ्यांनी तक्रारी सुद्धा केल्या मात्र संबधीत अधिकारी आतापर्यंत कुठलीही दाखल घेत नव्हते. महसूल प्रशासनाकडे या संदर्भात तक्रार केली असता महसूल प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी टोलवाटोलवी करतात अन्यथा थातुर मातुर कारवाई करतात.
चिनावल जवळील सुकी नदीत अवैध उत्खनन करून चिनावल – कोचुर रस्त्यावर संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे तेथे वाळूचा अवैध साठा केला असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या, तहसीलदार बंडू कापसे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता हेमंत महाजन, खिरोदा विभागाचे सर्कल चौधरी, पोलिस कर्मचारी यांनाही येथे बोलाविण्यात आले. त्यांना जाब विचारण्यात आला . शेतकऱ्यांनी रोष पाहता प्रशासनाने नदीपात्रातून आणलेली चोरटी वाळू पुन्हा नदीत टाकायला लावून खड्डे भरण्यास सुरूवात केली.
सुकी नदीच्या काठावर अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. मात्र, वाळू माफियांनी नदीकाठावरील जमिनींच्या खाली लांब अंतराचे बोगदे तयार केले. त्यातून सर्रास वाळूची वाहतूक केली जाते. ही वाहतूक बिना नंबरच्या ट्रॅक्टर द्वारे केली जाते. अथवा ट्रॅक्टर वरील नंबरची खाडाखोड केली असते. महसूल प्रशासन याना पाठीशी घालत असल्याने या सर्व प्रकाराला महसूल प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.
शेतकरी आक्रमक होताच तेथे दाखल तहसीलदार यांनी नदीपात्रातून आणलेली वाळू पुन्हा नदीत त्याच ठिकाणी टाकून खड्डे बुजण्यास सांगितले.या वेळी तहसीलदार बंडू कापसे, नायब तहसीलदार संजय तायडे. दूध संघाचे संचालक ठकसेन पाटील, पंकज नारखेडे, जयेश इंगळे, परेश महाजन, केतन पाटील, ,मयूर अनिल पाटील, भारंबे, सुमित नारखेडे यांच्यासह शेतकरी व नागरिक उपस्थित होते.