मालमत्तेच्या वाटणीवरून पित्यानेच केली पोटच्या मुलाची हत्या
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | मालमत्ता वाटणीच्या वादात पित्यानेच पोटच्या मुलाची निर्घृण हत्या केल्याची हृदयद्रावक घटना जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातून समोर आली आहे. बाळू राजेंद्र शिंदे वय २६ वर्ष. रा. बाळद खुर्द. ता. भडगाव.असे मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणात मुलाचा भाऊही सहभागी असून, पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील बाळद खुर्द गावात राहणाऱ्या मृत बाळू शिंदे याने घराच्या वाटणीत आपला हक्क मागितला होता. यावरून वडील राजेंद्र रामचंद्र शिंदे (वय ४८) आणि भाऊ भारत शिंदे (वय २२) यांनी त्याच्याशी वाद घालून त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर लाकडी दांडक्याने चेहऱ्यावर आणि छातीवर जबर मारहाण केल्याने त्यात त्याचा जागीच अंत झाला.
या प्रकरणी वडील राजेंद्र रामचंद्र शिंदे (वय ४८) आणि भाऊ भारत शिंदे (वय २२) रा. बाळद खुर्द. ता. भडगाव.जिल्हा जळगाव. या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. गावचे पोलीस पाटील सुनील लोटन पाटील (वय ५४) यांच्या तक्रारीवरून भारतीय दंड संहिता कलम १०३(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) अंतर्गत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के व पोलीस नाईक महेंद्र चव्हाण हे पुढील तपास करत आहेत.