प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करा अन्यथा, मुक्ताईनगरात नागरिकांचा आमरण उपोषणाचा इशारा
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर येथील संताजी नगर येथे येऊन प्राण घातक हल्ला करण्यात आल्याने युवक गंभीर जखमी होऊन जळगाव येथे उपचार घेत असून त्याची प्रकृती खालावण्याचे चिन्ह असतांना पोलिस प्रशासन मात्र, राजकीय दबाव व आर्थिक व्यवहारातून हल्ला करणाऱ्या युवकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करत नसल्याने गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करा अन्यथा आम्हाला जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसावे लागेल असा इशाराच नागरिकांनी दिला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक यांना श्रावण रामदास जावरे रा.मुक्ताईनगर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुक्ताईनगर येथिल गजानन श्रावण जावरे याच्यावर दि. १७ ऑक्टोंबर २०२३ रोजी रात्री शहरातील गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी असलेले तसेच राजकीय वरद हस्त लाभलेल्या काही लोकांनी प्राणघातक हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झालेला असून त्याला पुढील उपचारार्थ जळगाव येथे हलविण्यात आलेले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. अजूनही त्याची तब्येत बरी होण्याची चिन्हे दिसत नसून त्याचे बरे वाईट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
असे असतांना माझ्या मुलावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या सदरील लोकांवर मात्र दि. १७ ऑक्टोंबर २०२३ ते आजपावेतो कुठलीही कारवाई करण्यात आलेली नसून स्थानिक पोलीस प्रशासन अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना “राजकीय दबाव किंवा अर्थपूर्ण व्यवहारातून” सहकार्य करीत असल्याचे दिसून येत असून दिवसा ढवळ्या गुन्हेगारी करणाऱ्यांना अशा प्रकारे मोकाट सोडल्यास आमच्या सारख्या सर्व सामान्य लोकांना जगणे कठीण होईल.
तरी माझ्या मुलावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांकडून अजुनही माझ्या मुलाचे व आम्हा सर्व कुटुंबियांच्या जीविताला धोका असल्याने व पुढे काही घटना घडल्यास आणि आमच्या जीवितास काही बरे वाईट झाल्यास पोलीस प्रशासन जबाबदार असेल. त्यामुळे त्यांचेवर तात्काळ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा आम्हाला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव समोर आमरण उपोषणाचा पवित्रा घ्यावा लागेल याची नोंद घ्यावी. असे निवेदन समाज बांधव व परिसरातील नागरिकांतर्फे मुक्ताईनगर पोलीस निरीक्षकांना नागेश मोहिते यांना देण्यात आले आहे. यावेळी मोठ्या संख्येने महिला व पुरुष यांची उपस्थिती होती.
पोलीस निरीक्षकांकडून गंभीर गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ नागरिकांमध्ये चर्चा? एवढी गंभीर दुखापत होऊन सुद्धा मुक्ताईनगर पोलीस प्रशासन राजकीय दबाव किंवा अर्थपूर्ण व्यवहारातून मारहाण करणाऱ्या युवकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करीत नसल्याचे नागरिकांचा आरोप असून यामुळे मुक्ताईनगरकर संभ्रमात आहे. आता यांवर पोलीस अधीक्षक काय कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.