नशिराबाद पेठ परिसरातील दुचाकी जाळण्याचा घटनेला अखेर पूर्णविराम ; टोळीचा पर्दाफाश, तीन तरुण ताब्यात
नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ. दीपक लोखंडे | नशिराबाद येथील पेठ परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी जाळण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाचा तपास करत नशिराबाद पोलिसांनी शिताफीने कारवाई करून तीन संशयित तरुणांना ताब्यात घेतले आहे. सखोल चौकशीदरम्यान या तिघांनी दुचाकी जाळण्याच्या प्रकारात आपला सहभाग असल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
या प्रकरणात रोहित दिलीप नाथ (वय ३०), विपुल गोविंदा नाथ (वय २८) आणि राकेश विजय नाथ (वय ३०) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीदरम्यान नशिराबाद पेठ परिसरात घडलेल्या दुचाकी जाळण्याच्या घटनांमध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग असल्याचे समोर आले. तसेच संबंधित संशयितांनी या भागातील आणखी काही दुचाकी जाळल्याची कबुली दिल्याची माहितीही तपासात पुढे आली आहे. दरम्यान, नशिराबाद पोलिस ठाण्यात या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात त्यांना इतर कोणाची साथ होती का, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
या संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेड यांनी सांगितले की, ताब्यात घेतलेल्या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर सहकाऱ्यांचा शोध घेतला जात असून त्यांनाही लवकरच गजाआड केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पेठ परिसरात सलग घडलेल्या या तिसऱ्या दुचाकी जाळण्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.


