अखेर रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उपसभापती वर अविश्वास ठराव मंजूर
रावेर,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील व उपसभापती योगेश पाटील यांच्याविरुद्ध संचालकांनी दाखल केलेला अविश्वास ठराव आज बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या विशेष सभेत १४ विरुद्ध ० असा ठराव मंजूर एकमताने मंजूर करण्यात आला. सहाय्यक निबंधक जे बी बारी यांनी पीठासन अधिकारी म्हणून काम पाहिले. सभापती सचिन पाटील, उपसभापती योगेश पाटील, संचालक योगीराज पाटील व सय्यद असगर हे चौघे संचालक सभेला गैरहजर होते.
अधिक वृत्त असे की, ११ सप्टेबरला रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १२ संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. या प्रकाराने रावेर तालुक्यासह जिल्ह्यात राजकीय भूकंप झाला होता.त्या संदर्भात आज रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात या अविश्वास प्रस्तावाची पडताळणी करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी संचालक प्रल्हाद पाटील, डॉ राजेंद्र पाटील,मंदार पाटील, राजेंद्र चौधरी, पंकज पाटील, पितांबर पाटील, जयेश कुयटे, गणेश महाजन, पांडुरंग पाटील, सिकंदर तडवी, रोहित अग्रवाल, विलास चौधरी, सौ सविता पाटील व सौ मनीषा पाटील असे एकूण १४ संचालक या विशेष सभेस हजर होते. तर सभापती सचिन पाटील उप सभापती योगेश पाटील, संचालक योगीराज पाटील, व सय्यद असगर हे चौघे गैरहजर होते.
ही विशेष सभा असल्याने बाजार समितीच्या आवारात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सभेच्या दोन्ही गेटवर छावणीचे स्वरूप आले होते. झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये, विशेष सभेत सभापती सचिन पाटील आणि उपसभापती योगेश पाटील यांच्या विरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव १४ विरुद्ध ० मतांनी मंजूर झाला. त्यामुळे दोघांनाही आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. सहायक निबंधक जे.बी. बारी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली.
दरम्यान,वैयक्तिक कामामुळे सभापती पदाला वेळ देऊ शकत नसल्याचे कारण सांगत सभापती सचिन पाटील व उपसभापती योगेश पाटील यांनी अविश्वास प्रस्तावासाठी आयोजित केलेल्या सभेला काही मिनिटे शिल्लक असताना पदाचे राजीनामे जिल्हा उपनिबंधाकाकडे दिले.ज्यांच्या विरोधात ठराव होता ते माजी सभापती सचिन पाटील, उपसभापती योगेश पाटील आणि संचालक योगीराज पाटील, सैय्यद अजगर सैय्यद तुकडू हे मात्र या सभेत अनुपस्थित होते. अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर माजी आमदार अरुण पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्यासह तालुक्यातील शेतकरी, या वेळी हजर होते.

