क्राईमजळगाव

जळगाव मध्ये पुन्हा गोळीबार

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जुन्या वादातून घरावर गोळीबार करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना जळगाव मधील रामेश्वर कॉलनी मध्ये घडली. मध्यरात्री बंदुकीतून गोळी झाडून दहशत निर्माण करणाऱ्या तरुणासह तिघांवर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात राम विश्वास बोरसे. वय २६ वर्ष, रा. मंगलपुरी परिसर, रामेश्वर कॉलनी, जळगाव. यांनी फिर्याद दिली आहे. राम बोरसे हे आई, वडील, भाऊ, वहिनी यांच्यासह रामेश्वर कॉलनी मध्ये राहतात. रिक्षा चालवून ते परिवाराचा उदरनिर्वाह करतात.

मेहरूण परिसरातील संशयित आरोपी दिनेश भारत चौधरी यांच्या बहिणीचा घटस्फोटासाठी अर्ज न्यायालयात प्रलंबित आहे. तसेच जानेवारी महिन्यात दिनेशची बहिण ही घरातून पळून गेली होती. या सर्व प्रकाराला रिक्षाचालक राम विश्वास बोरसे हाच जबाबदार आहे असा संशय दिनेश चौधरी याला होता. त्यावरून त्याने राम बोरसे याला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. याबाबत राम बोरसे याने यापूर्वी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.

शुक्रवार दि. २५ एप्रिल रोजी पहाटे सुमारे दीड वाजेच्या सुमारास राम बोरसे याने घरात गर्मी होत असल्याने लाकडी दरवाजा उघडा ठेवला व लोखंडी ग्रीलचा दरवाजा बंद ठेवला होता. त्या वेळी अचानक राम बोरसे यांना गोळीबाराचा आवाज आला. त्यांचे वडील दरवाजाकडे गेले असता त्यांनी दोन लोकांना घराच्या पोर्चमध्ये पाहिले. तर एक इसम घरासमोर बाईक घेऊन थांबलेला दिसला. राम बोरसे हे दरवाजा जवळ आले असता पोर्चमधील दोन्ही इसम उड्या मारून रस्त्यावरील दुचाकीस्वाराकडे पळाले. त्यातील एक दिनेश भारत चौधरी हा असल्याचे राम बोरसे यांना दिसले. तिघेही संशयित दुचाकीवर बसून ते पळून गेले. तेथे राम बोरसे यांना रस्त्यावर गोळीची पुंगळी पडलेली दिसली. तसेच लोखंडी दरवाजाच्या ग्रीलवर गोळी लागल्याचे निशाण दिसून आले तर आतल्या बाजूस गोळीचे तुकडे पडलेले दिसले. अशी माहिती पोलीस स्टेशनला दिली यावरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिनेश भारत चौधरी आणि इतर दोन्ही व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!