नाशिक

अवैध उत्खनन केल्यास पाच पट दंड, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा, दगडापासून कृत्रिम वाळू बनविणार

नाशिक, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | अवैध उत्खनन केल्यास त्याला पाच पट दंड आकारला जाईल, असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक येथे विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिला आहे.

तर राज्यात एक नवीन संकल्पना राबविली जात आहे. दगडापासून कृत्रिम वाळू बनविण्याची ही नवी संकल्पना राबविली असून प्रत्येक जिल्ह्यात ५० क्रशर दिले जातील. असेही प्रसार माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी सांगितले.

तसेच या पुढे आता जिल्हाधिकारी कुणालाही टेकडी खोदण्याच्या परवानगी देणार नाही. पंपाने वाळू काढण्यास प्रतिबंध आहे. एम स्टँड नावाची संकल्पना सरकार राबवून कृत्रिम वाळू तयार करण्यासाठी मदत केली जाईल. ज्यांचे खडी क्रशर आहेत, त्यांना पुढील तीन वर्ष कृत्रिम वाळू तयार करावी लागेल. अन्यथा नंतर परवानगी दिली जाणार नसल्याचे त्यांनी सूचित केले. २० लाख घरे मंजूर असून वाळू मिळत नव्हती. त्यामुळे तहसीलदारांना अधिकार देण्यात आले. घरकुलांसाठी पाच ब्रास वाळू मोफत द्यायची हे ठरवून त्याची अमलबजावणी सुरू करण्यात आली.

त्या नंतर अधिकची वाळू एक ब्रासला ६६० रुपये भरून मिळेल. गौण खनिज स्वामित्व वसुली प्रकरणे प्रलंबित ठेवू नयेत.अशा सूचना याचवेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्या.. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा (नाशिक), डॉ. पंकज आशिया (अहिल्यानगर), आयुष प्रसाद (जळगाव), जितेंद्र पापळकर (धुळे), मिताली सेठी (नंदुरबार) हे उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!