३० लाखासाठी परीचारिकेची गळा आवळून हत्या, जिल्हा परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक
जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रातील निवृत्त परिचारिका स्नेहलता अनंत चुंबळे .वय ६० वर्ष. यांना मिळालेली ३० लाखांची रक्कम लाटण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेच्या दोन लिपिक कर्मचाऱ्यानी गोड बोलून सोबत नेले व कारमध्ये स्नेहलता चुंबले यांचा गळा आवळून हत्या करून मृतदेहाची अज्ञातस्थळी विल्हेवाट लावली. साळवा नांदेड ता. धरणगाव. जिल्हा जळगाव. येथून एप्रिल २०२३ मध्ये स्नेहलता अनंत चुंबळे .वय ६० वर्ष. या सेवा निवृत्त झाल्या होत्या.
सेवानिवृत्त परिचारीकेचा ३० लाखांच्या रक्कमेसाठी जिल्हा परिषदेच्या दोन्ही कर्मचाऱ्यांनी हत्या केल्याचे उघड झाले आहे. घरी सोडण्याचे सांगून महिलेला कारमध्येच गळा दाबून ठार करत शिरपूर तालुक्यातील तापी नदी पात्रात पंधरा दिवसांपूर्वी तिचा मृतदेह फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेचा मृतदेह अद्याप मिळून आला नसून पोलीस तपास करीत आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी जि.प.आरोग्य विभाग व बांधकाम विभागातील जिजाबराव पाटील. वय ४८, रा. मुंदडानगर, अमळनेर. व विजय रंगराव निकम . वय ४६ या दोघांना अटक केली आहे. खून करुन संशयितांनी फेकून दिलेल्या महिलेचा मृतदेह अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांसमोर मृतदेह शोधण्याचे आव्हान आहे. स्नेहलता अनंत चुंबळे ( वय ६०, रा.खोटेनगर, जळगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. स्नेहलता चुंबळे या धरणगाव तालुक्यातील साळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारीका होत्या. त्या एप्रिल २०२३ मध्ये सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्यानंतर त्या त्यांचा मुलगा समीर संजय देशमुख यांच्याकडे नाशिकला वास्तव्यास होत्या.
मयत महिलेल्या मुलाने दिलेल्या फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे महिलेला नाशिकला फ्लॅट घ्यावयाचा होता. त्यासाठी त्यांनी ३० लाखांची रक्कम २० ऑगस्ट रोजी रिंग रोडवरील बँकेतून काढली होती. याच माहितीच्या आधारावर तालुका पोलिसांनी बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या फुटेजमध्ये स्नेहलता यांच्यासोबत जिजाबराव पाटील हे आढळून आले. जिजाबराव पाटील हे साळवा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात लिपीकाचे काम करतात.
पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, स्नेहलता चुंबळे यांना खोटेनगर स्टॉपजवळ सोडल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांकडून त्यानंतर जिजाबराव पाटीलचे फोन कॉल डीटेल्सचे तपासले. त्यातून जिजाबरावने विजय निकम याच्याशी सर्वाधिक संपर्क केल्याचे स्पष्ट झाले. त्यातून दोघांना ताब्यात घेतल्यानंतर दोघांनीही खुनाची कबुली दिल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांनी महिलेसोबत रिंगरोडवरील बँकेतून ३० लाखांची रक्कम काढल्यानंतर त्यांच्या कारमध्ये बसविले. त्यानंतर महिलेला घरी सोडले नाही. तसेच वाहनातच महिलेचा गळा आवळून खून केला. त्यानंतर महिलेचा मृतदेह शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील तापी नदीच्या पुलावरुन नदीत फेकल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार फ्लॅट घेण्यासाठी महिलेला ३० लाख रुपये काढायचे होते. हे जिजाबराव पाटील याला माहिती होते. महिलेसोबत एकाच ठिकाणी कामाला असल्याने, जिजाबराव हा महिलेसोबत पैसे काढायला गेला होता. फ्लॅट घेताना कॅश रक्कम दिली तर फ्लॅट कमीमध्ये मिळेल असे सांगत जिजाबरावने महिलेचा विश्वास जिंकला. त्यानंतर त्या पैशांसाठी महिलेचा खून केल्यानंतर महिलेचा मृतदेह तापी नदीत फेकून दिला. आता हा मृतदेह फेकून १५ दिवस उलटले आहेत. मात्र, अजूनही मृतदेह सापडलेला नाही. पोलिसांकडून मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे. दरम्यान दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जिजाबराव पाटील व विजय निकम जळगाव जिल्हा परिषदेच्या कर्मचारी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आहेत. दोघांव्यतिरिक्त या गुन्ह्यात इतरही सहभागी आहेत का, याचा शोध पोलिस घेत आहेत.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा